केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी तीन दिवसांपूर्वी दिल्लीत माध्यमांशी बोलताना राजकीय भविष्यवाणी करत, राज्यात लवकरच भाजपाचं सरकार येणार असल्याचं म्हटलं. त्यानंतर त्यांच्या या विधानाला विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी देखील दुजोरा देत, राज्यात भाजपाचं सरकार येणारचं असं ठासून सांगितल्यानंतर, आता खुद्द भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील अशाच प्रकारचं विधान केल्याने, राज्यात खरोखरच सत्ताबदल होणार की काय? अशा चर्चांना उधाण आलं आहे. सरकार पडणार आहे असं म्हटल्यामुळे कुणाच्या पोटात दुखण्याचं काय कारण? माझ्या प्रत्येक म्हणण्याला आधार असतो. असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज पहाटे सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांचा पराभव करून विजयी झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर उमेदवार ज्ञानदेव रांजणे यांच्या घरी आंबेघर(ता.जावळी) येथे पोहोचून त्यांचे अभिनंदन केले. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलाताना विविध प्रश्नांवर प्रतिक्रिया दिली. काही दिवसांपूर्वी सातार येथेच राष्ट्रवादी काँग्रसेचे अध्यक्ष शरद पवार यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला होता. चंद्रकांत पाटील हे आता हस्तरेषा बघतात असं वाटत असल्याचं पवार म्हणाले होते. पवारांच्या या विधानाला चंद्रकांत पाटील यांनी आज प्रत्युत्तर दिलं.
चंद्रकांत पाटील म्हणाले, “ काल झालेल्या पत्रकारपरिषदेत मी म्हटलं की, काशीस जावे नित्य वदावे…मला काशीच्या तीर्थ यात्रेला जायचं आहे. तर सारखं काहीतरी काम निघतं. पण सारखं म्हणत राहायचं असतं, की मला काशीला जायचं आहे, मला काशीला जायचं आहे. हा आपला ग्रामीण शब्दप्रयोग आहे, काशीस जावे नित्य वदावे. तसं, सरकार पडणार आहे असं म्हटल्यामुळे कुणाच्या पोटात दुखण्याचं काय कारण आहे? असं गरजेचं नाही की प्रत्येक वेळेला माझ्या म्हणण्याला आधार नसतो. किंबहुना माझ्या प्रत्येक म्हणण्याला आधार असतो. पण मी यावर विश्वास ठेवणारा आहे की प्रत्येक गोष्ट ठरलेली असते त्यावेळी होते. त्यामुळे मी असं म्हणत राहणार आणि हे म्हणण्याचं स्वातंत्र्या मला आहेच ना. ज्या दिवशी गणितं जमत नाहीत त्या दिवशी माणसं बाहेर पडतात. प्रत्येक गोष्टीची एक वेळ ठरलेली असते. ती या विषयाची सरकार पडणं किंवा न पडणं काय ठरली आहे, हे कळण्या इताक अंतर्ज्ञानी मी अजून झालेलो नाही, तेवढा अंतर्ज्ञानी मी जर झालो तर हिमालयातच जाईन.”
“ सरकार तर भाजपाचं येणारचं, फक्त आता आम्ही … ” ; प्रवीण दरेकरांचं पत्रकारपरिषदेत विधान!
याचबरोबर, “ भाजपाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे पक्ष सोडून जातील अशी चर्चा होती, मात्र ते गेले नाहीत हेच त्यांचे मोठेपण आणि आमचे यश आहे.” असं देखील चंद्रकांत पाटील यांनी यावेळी बोलून दाखवलं.