नबाब मलिक यांच्यावर ईडीच्या कारवाईनंतर अटकेची कारवाई झाली. देशद्रोही खटल्यात मलिक अडकले असतानाही त्यांचा राजीनामा घेण्यास नकार देणे म्हणजे राज्यातील सरकार दाऊदचे समर्थन करत आहे, असा आरोप भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी कोल्हापूर येथे मंगळवारी पत्रकार परिषदेत केला. शिवसेना नेते माजी वन मंत्री संजय राठोड यांनी राजीनामा द्यावा; अन्यथा राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू करू देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
चंद्रकांत पाटील म्हणाले, “ईडीच्या कारवाईनंतर मंत्री नबाब मलीक यांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली. देशद्रोही खटल्यात मलिक अडकले असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे त्यांचा राजीनामा घेत नाहीत. याचा अर्थ हे सरकार दाऊदचे समर्थन करते. मलिक यांच्या अटकेनंतर संपूर्ण मंत्रिमंडळ निदर्शने, धरणे आंदोलन करते हे आश्चर्यकारक आहे. मलिक यांचा राजीनामा घेतला जात नाही तोपर्यंत भाजपा आंदोलन सुरू ठेवेल. मलिक यांनी खरेदी केलेली तीनशे कोटीची मालमत्ता ही दाऊदसाठीच होती,” असा आरोपही यावेळी पाटील यांनी केला.
“….तर तो संभाजीराजेंचा क्षणिक आनंद;” चंद्रकांत पाटलांचा टोला
दाऊद इब्राहिमला मुसक्या बांधून भारतात आणू, असा दावा भाजपाने केला होता पण केंद्रात सत्ता असूनही त्याकडे दुर्लक्ष का केले जाते. ही या प्रश्नावर आमदार पाटील म्हणाले, “दाऊदसह आर्थिक गुन्ह्यात अडकलेल्या आरोपींना भारतात आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र आंतरराष्ट्रीय आर्थिक आणि गुन्हे विषयक कायदे अधिक कडक असल्याने त्यात अडसर येत आहेत. तरीही सरकारचे प्रयत्न सुरूच आहेत.”
नवाब मलिक, संजय राठोड, रणजित पाटील असे आघाडीतील मंत्री गुन्ह्यात अडकत आहेत. असे आणखी किती मंत्र्यांवर गंडांतर येऊ शकते? या प्रश्नावर आमदार पाटील म्हणाले, रोज एक नाव पुढे येत आहे. ही परिस्थिती पाहता शिल्लक कोणता मंत्री राहणार हे दुर्बिण घेऊन शोधण्याची वेळ आली आहे.
रश्मी शुकला या फोन टॅपिंग प्रकरणांत गुंतल्या असतील तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करून न्यायालयाद्वारे कारवाई करायला राज्य सरकारला कोणी अडवलेले नाही, असंही पाटील म्हणाले.