भाजपा आमदार आशिष शेलार यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधानासंदर्भात मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे आता भाजपा आक्रमक झाली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हा शेलार शिवसेनेविरोधात आक्रमकपणे बोलतात त्यामुळे त्यांना शांत करण्याचा प्रयत्न असल्याचं, म्हणत ठाकरे सरकारवर निशाणा साधला. तर आता भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी देखील महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.
“भ्रष्टाचार, खंडणी, वसुली यापलिकडे महाविकास आघाडीचे कुठले कर्तृत्व नाही. आणि याविरुद्ध कुणी बोलले, तर त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकविणे, यापलिकडे दुसरा उद्योग नाही. जनतेची सरकार म्हणून सेवा करणे, एवढे एक सोडून सारे काही सुरू आहे. संपूर्ण भाजपा आशिष शेलार यांच्या पाठीशी आहे!” असं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ट्विटद्वारे म्हणाले आहेत.
तर, “एकीकडे संजय राऊत आक्षेपार्ह बोलत आहेत, तर दुसरीकडे मविआतील इतर नेते वाट्टेल ते बोलत आहेत. तुम्हांला एक न्याय व आमचे नेते जे काही बोलले नाही त्यासाठी त्यांना वेगळा न्याय! सरकारच्या विरोधात बोलणार्या विरोधी पक्ष नेत्यांवर अशाप्रकारे गुन्हे दाखल केले जातात. सूड भावनेने कारवाई करण्याचे काम केले जात आहे, त्याचा आम्ही निषेध करतो.” असा विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी आरोप केला आहे.
तसेच, “तुम्हाला एक न्याय आणि आमचा नेता काही बोलला तर त्या वेगळा न्याय, असं चालणार नाही. हे सरकार विरोधी पक्षामधील जे कोणी सरकारच्या विरोधात बोलत आहे, त्यांच्यावर अशा पद्धतीने गुन्हे दाखल करत, सूड भावनेतून कारवाई करण्याचं काम सुरू आहे. याचा आम्ही निषेध करत आहोत. पोलीस जर अशाप्रकारे सरकारच्या दबावाखाली वागणार असतील आणि जर जनतेचा उद्रेक झाला तर त्याला सर्वस्वी महाविकासआघाडी सरकार जबाबदार असेल.” असा सूचक इशारा देखील दरेकरांनी माध्यमांशी बोलतान दिलेला आहे.
याचबरोबर,“मला वाटतं हा सगळा नियोजनबद्ध कार्यक्रम आहे. महापौरांनी बोलायचं काही लोकांनी यायचं. मग तिकडून सरकार दबाव आणणार, गुन्हा दाखल करणार. ही सगळी एक स्क्रीप्ट ठरलेली आहे आणि विरोधी पक्षाला अशा पद्धतीने अडकवून सूडभावनेने कारवाई करायची, हा त्यांचा ठरलेला कार्यक्र आहे. जे विरोधात जास्त बोलताता त्यांच्यावर कारवाई करायची असं त्याचं नियोजन दिसत आहे. हा सगळा विरोधी पक्षाला दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे.” असा आरोप महाविकासआघाडी सरकारवर प्रवीण दरेकरांनी केलेला आहे.
“कदाचित आशिष शेलार यांना शांत करण्यासाठी….,” देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनेवर गंभीर आरोप
तर, “भाजपाचा कोणताही नेता आणि विशेषत: आशिष शेलार हे कोणत्याही महिलेबद्दल अभद्र किंवा चुकीचा शब्द वापरु शकत नाहीत, महापौरांबद्दल तर अजिबात नाही. काल त्यांची पत्रकार परिषद किंवा प्रेस नोट याचा चुकीचा अर्थ काढून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आशिष शेलार शिवसेनेविरोधात आक्रमकतेने बोलतात म्हणून त्यांना शांत करण्यासाठी कदाचित गुन्हा दाखल झाला का हा देखील एक प्रश्न आहे,’ अशी शंका देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केली आहे.
आशिष शेलारांची टीका
“ही तक्रार खोटी, गुन्हा खोटा, कायदेशीर प्रक्रिया खोटी. या राज्यात पोलीस बळाचा दुरुपयोग, सत्तेचा दुरुपयोग केवढ्या मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो, याचं हे जिवंत उदाहरण आहे. मी कोणत्याही महिलेबाबत, महापौरांबाबत, कोणत्याही व्यक्तीबाबत अपमानास्पद, बदनामीकारक वक्तव्य, छेडछाड किंवा कोणताही गुन्हा केलेला नाही. सातत्याने दोन दिवस वेगवेगळ्या पोलीस स्थानकात दबावतंत्र करून, सत्तेचा दुरुपयोग करून हा खोटा गुन्हा दाखल केला आहे”, असं आशिष शेलार म्हणाले आहेत.