शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्या कथित बंडखोरीमुळे राज्याच्या राजकीय वातावरणात वादळ उठलं आहे. शिंदेंसोबत इतरही शिवसेनेचे काही आमदार असल्यामुळे राज्य सरकारच्या स्थैर्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंची नाराजी दूर करण्यासाठी शिवसेनेकडून प्रयत्न केले जात असताना दुसरीकडे भाजपाकडून यावरून सरकारला लक्ष्य करण्याची संधी साधली जात आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यासंदर्भात पत्रकार परिषदेत बोलताना शिवसेनेवर आणि राज्य सरकारवर खोचक शब्दांत टोला लगावला आहे.

विधानपरिषद निकालावरून टीका

चंद्रकांत पाटील यांनी यावेळी बोलताना विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीच्या एका उमेदवाराचा पराभव झाल्याच्या पार्श्वभूमीवर टीका केली आहे. “राज्यसभेला १२३ आमदारांनी भाजपाला मतदान केलं. विधानपरिषदेला तर कमाल झाली. १३४ जणांनी भाजपाला मतदान केलं. याच भितीने अडीच वर्षापासून विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक झालीच नाही. तुम्ही सरकारमध्ये असून उपयोग काय? तुमचा आमदारांवर विश्वास नाही. त्यामुळे भाजपाला स्वत:ची ताकद दाखवण्याची एक चांगली संधी मिळाली”, असं पाटील म्हणाले. “देवेंद्र फडणवीसांचं नेतृत्व काय आहे, त्यांची हुशारी काय आहे हे यानिमित्ताने सिद्ध झालं”, असा टोलाही त्यांनी लगावला.

“सरकार पडलं तर राष्ट्रवादी भाजपासोबत जाणार का?” पत्रकारांच्या प्रश्नावर शरद पवारांची सूचक प्रतिक्रिया; होकारही नाही आणि…

भाजपाची वेट अँड वॉचची भूमिका

“आत्ता कोणतंही मत व्यक्त करणं घाईचं होईल. त्यामुळे वेट अँड वॉच अशी भूमिका भाजपाची आहे. अडीच वर्षापूर्वी जेव्हा हे अशास्त्रीय सरकार निर्माण झालं, तेव्हाच पहिल्या महिन्याभराच्या काळात अनेक आमदारांनी ‘काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जायचं असेल तर आम्हाला तुमच्यासोबत राहायचं नाही’ असं सांगितलं होतं. पण हे त्यांच्या नेतृत्वाचं कौशल्य आहे की त्यांनी उद्याचा वायदा देऊन लोकांना आपल्यासोबत ठेवलं. भाजपाला हा धडा शिकवण्याचा प्रयत्न आहे असं सांगून सत्तेत सहभागी व्हायला लावलं”, असंही पाटील म्हणाले.

“आम्ही सत्तेसाठी कधीही…”; नॉट रिचेबल असणाऱ्या एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

“एकनाथ शिंदेच म्हणाले असतील, “आम्ही पुन्हा येऊ”

एकनाथ शिंदेंनी वेगळी वाट धरण्याचा प्रयत्न केला आहे. पण त्यात भाजपासोबत कोणतीही पूर्वयोजना नाही. यातून पुढे काय होणार आहे हे सांगण्यासाठी मी ज्योतिषी नाही. या घडामोडींमध्ये कोणताही प्रस्ताव भाजपाने शिंदेंना किंवा शिंदेंनी भाजपाला दिलेला नाही. एकनाथ शिंदेंनी यानिमित्ताने त्यांच्या नेतृत्वाला हा इशारा दिला असेल की तुम्ही हिंदुत्व सोडणं, अजानच्या स्पर्धा वगैरे बंद करणार असाल तर आम्ही पुन्हा येऊ”, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला.

Story img Loader