लोकसत्ता प्रतिनिधी
सोलापूर : तुतारी वाजवा किंवा मशाली पेटवा, मात्र महाराष्ट्रात लोकसभेच्या आगामी निवडणुकीत सर्वच्या सर्व ४८ जागा महायुतीलाच मिळतील, असा दावा भाजपचे नेते, सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
सोलापुरात विविध कार्यक्रमांसाठी आलेले पालकमंत्री पाटील हे सायंकाळी शहर हद्दवाढ भागातील शेळगी-दहिटणे परिसरात १२ कोटी रूपये खर्चाच्या मुख्य रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचा शुभारंभ करताना प्रसार माध्यमांशी बोलत होते.
आणखी वाचा-मलाही खासदार व्हावंसं वाटतयं – सदाभाऊ खोत
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला तुतारी चिन्ह मिळाल्याच्या मुद्यावर विचारलेल्या प्रश्नावर बोलताना चंद्रकांत पाटील यांनी, तुतारी चिन्ह बेदखल केले. आता तुतारी वाजवा किंवा मशाली पेटवा, त्यातून काही फायदा होणार नाही. आजची स्थितीच भाजपसह महायुतीला एवढी अनुकूल होत आहे की, आजमितीला भाजपच्या बाजूने ३६ टक्के मतदारांचे समर्थन आहे. तर महायुतीला मिळून संभाव्य मतदान ४६ टक्क्यांपर्यंत आहे. मतदारांचा कल जाणून घेऊन अजमावलेला हा अंदाज स्पष्टपणे महायुतीला कौल देणारा आहे. त्याचा विचार करता राज्यात लोकसभेच्या सर्व ४८ जागा महायुतीला मिळतील. तरीही आम्ही ४५ जागा जिंकण्याचा दावा करतो. आम्ही शेवटी जमिनीवर पाय ठेवून लोकसभा निवडणुकीत उतरत आहोत. यात कोठेही गाफिल राणार नाही, असेही पाटील यांनी सांगितले.