धुळ्यात बैलपोळ्याला मिरवणूक काढली म्हणून दलित कुटुंबाला मारहाण करत बहिष्काराची घटना घडली. यानंतर राज्यात इतर ठिकाणीही अशाच काही घटना घडताना दिसत आहेत. यावर राज्य सरकार काय पावलं उचलणार, दोषींवर काय कारवाई करणार असा प्रश्न पत्रकारांनी भाजपा नेते व मंत्री चंद्रकांत पाटलांना विचारला. यावर चंद्रकांत पाटलांनी आपली भूमिका स्पष्ट करत काय घडलंय हे पाहून कारवाई केली जाईल, असं आश्वासन दिलं. ते बुधवारी (३१ ऑगस्ट) पुण्यात माध्यमांशी बोलत होते.

चंद्रकांत पाटील म्हणाले, “मी या घटनांची माहिती घेईन. या प्रत्येक घटनेचा सह्रदयतेने, संवेदनशीलतेने दखल घेण्याचा प्रयत्न शासन करत आहे.”

“काय घडलंय हे पाहून कारवाई केली जाईल”

“आम्ही गावोगावच्या अशा घटनांवर लक्ष ठेऊन आहोत. त्या घटनांमध्ये काय घडलंय हे पाहून कारवाई केली जाईल,” असं आश्वासनही चंद्रकांत पाटलांनी यावेळी दिलं.

“त्यांना पुण्याचे प्रश्न सोडवण्यापासून कुणीही अडवलं नव्हतं”

नीलम गोऱ्हेंनी पुण्याला कुणीच वाली नाही अशी टीका केली. त्याला उत्तर देताना चंद्रकांत पाटील म्हणाले, “एकतर नीलम गोऱ्हे सभापती म्हणून स्वतःचे अधिक अधिकार वापरतात. ते त्यांनी पुण्यासाठी वापरायला अडचण नव्हती. खरंतर सभापतींनी सर्वांचं ऐकायचं असतं. परंतू, सदस्यांपेक्षा त्याच जास्त बोलतात. सभापतींनी पक्षाचा प्रवक्ता बनायचं नसतं, तर या पक्षाचा प्रवक्ता बनतात. त्यांना पुण्याचे प्रश्न सोडवण्यापासून कुणीही अडवलं नव्हतं.”

“त्यांनी पुण्यासाठी काय काय केलं याची यादी द्यावी”

“अडीच वर्षांचं सरकार होतं, थोडंथोडकं नाही. त्या काळात त्यांनी पुण्यासाठी काय काय केलं याची यादी द्यावी,” अशी मागणीही चंद्रकांत पाटलांनी केली.

हेही वाचा : देवेंद्र फडणवीस पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवणार का? ब्राह्मण महासंघाच्या मागणीवर चंद्रकांत पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले…

“पालकमंत्री नाही म्हणून काही थांबलेलं नाही”

चंद्रकांत पाटलांनी पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला होणारी दिरंगाई यावरही भाष्य केलं. ते म्हणाले, “दोघेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री होते त्या काळातही निर्णय घेणं थांबवलेले नाहीत. नंतर मंत्रीमंडळ विस्तार झाला आणि खातेवाटपाला उशीर झाला. त्यानंतरही कोणतेही निर्णय थांबले नाही. पालकमंत्री नसण्याचं मी समर्थन करत नाही, मात्र, पालकमंत्री नाही म्हणून काही थांबलेलं नाही. लवकरच पालकमंत्र्यांचीही नेमणूक होईल.”