मंत्रीपदावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे राजकारण, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची किमान समान कार्यक्रमाची मागणी हे आपल्या ताटात अधिक तूप वाढवून घेण्याचा प्रकार आहेत. याचा सत्ता बदलावर परिणाम होणार नाही; कारण हे सत्तेला चिकटलेले मुंगळे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचा इतिहास पाहता स्वतःच्या फायद्यासाठी ते कोणाबरोबर कधीही जातील, अशी टीका भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी (१ एप्रिल) कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषदेत केली.
कोल्हापूर विधानसभा पोटनिवडणुकीत विरोधक मोडून तोडून प्रचार करत आहेत, असा आरोप आमदार पाटील यांनी केला. चंद्रकांत पाटील म्हणाले, “माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या महिलांविषयक विधानाचा विरोधक विपर्यास करत आहे. महिलांविषयी महाविकास आघाडीला इतका कळवळा असेल, तर करुणा मुंडे यांना न्याय मिळवून द्यावा. धनंजय मुंडे यांनी कसा अन्याय केला याचा पाढा त्या वाचत आहेत. अशा महिलेला विरोधकांनी न्याय मिळवून द्यावा.”
“देगलूर पोटनिवडणुकीवेळी पेटीएमद्वारा मतदारांना पैसे देण्याचा प्रकार”
“‘जग सुधारेल पण कोल्हापूर सुधारणार नाही’ असे विधान असलेली अशा माझ्या नावाची बनावट चित्रफीत बनवून विरोधकांनी अपप्रचार चालवला आहे. याबाबत सायबर क्राईमकडे तक्रार केली आहे. काही अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी कौटुंबिक माहिती मिळवणारे फॉर्म भरून घेत आहेत. हा प्रकार नेमका काय आहे याचीही चौकशी करण्याची मागणी केली आहे. देगलूर पोटनिवडणुकीवेळी पेटीएमद्वारा मतदारांना पैसे देण्याचा प्रकार झाला होता. कोल्हापुरात असे काही होत असेल, तर तो प्रयत्न हाणून पाडू,” असे पाटील यांनी सांगितले.
“…अन्यथा राष्ट्रवादी मातोश्रीवर सीसीटीव्ही कॅमेरा लावून बसेल”
“महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाल्यावर आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना गृहमंत्रिपद शिवसेनेकडे घ्यावे अन्यथा राष्ट्रवादी मातोश्रीवर सीसीटीव्ही कॅमेरा लावून बसेल असा सावधगिरीचा सल्ला दिला होता. आता गृहमंत्री पदावरून राष्ट्रवादीच्या हालचाली पाहता त्याची प्रचिती येत आहे. सत्तेसाठी राष्ट्रवादी कोणत्याही थराला जाऊ शकतो. हे त्यांच्या आजवरच्या इतिहासातून दिसून आले आहे,” अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली.