भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह परिवहन मंत्री अनिल परब यांना टोला लगावला आहे. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब सल्ला घेण्यासाठी शरद पवार यांच्याकडे जात असले तरी सारे निर्णय शरद पवारच घेतात, असा टोला चंद्रकांत पाटलांनी लगावला. तसेच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या देशातील ३ राज्यांच्या विधानसभा निवडणुका लढवण्याच्या निर्णयावरही टीका केली. ते बुधवारी (१२ जानेवारी) कोल्हापूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते.
चंद्रकांत पाटील म्हणाले, “राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी ३ राज्यातील निवडणुका लढवणार असल्याचे विधान केले आहे. मात्र, यापूर्वी झालेल्या निवडणुकांमध्ये उमेदवारांची जप्त झालेली अनामत रक्कम, पराभव याचा कसलाही विचार न करता राष्ट्रवादी निवडणूक लढवत आहे. अन्य राज्यात निवडणुका लढवून आपला पक्ष राष्ट्रीय स्तरावरचा आहे हे दाखवण्याचा हा प्रयत्न आहे. असं असलं तरी त्यातून फारसे काही साध्य होणार नाही.”
“परिवहन मंत्री सल्ला घेण्यासाठी शरद पवारांकडे जातात, पण सारे निर्णय…”
“परिवहन मंत्री अनिल परब शरद पवार यांच्याकडे सल्ला घेण्यासाठी जातात. मात्र, सारे निर्णय पवार हेच घोषित करतात,” असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी टोला लगावला.
“फसवून पराभूत करणे ही काँग्रेसची परंपरा”
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत भाजप व भाजपच्या सहयोगी उमेदवारांना पराभूत करणे ही सत्ताधाऱ्यांची परंपराच आहे, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपचे सहयोगी आमदार प्रकाश आवाडे, अशोक चराटी आदींचा पराभव झाला आहे. याकडे लक्ष वेधले असता चंद्रकांत पाटील म्हणाले, “जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपाची ताकद मर्यादित होती. अधिक जागा देणाऱ्या सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडे जाण्याचा निर्णय घेतला. परंतु त्यांनी आवाडे, चराटी यांना राजकारण करून पराभूत केले. फसवून पराभूत करणे ही त्यांची परंपराच आहे. तरीही जिल्हा बँकेमध्ये भाजपचे तीन सदस्य आहेत.”
“…म्हणून शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली”
“शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. उद्या त्यांनी काही वेगळी भूमिका घ्यायची ठरवले, तर त्यांना आमच्या संचालकांचा उपयोग होईल,” असे म्हणत त्यांनी नव्या राजकीय जोडणीला प्रतिसाद दिला.
हेही वाचा : अजित पवार माणसं पाहूनच वेळ देतात : अमोल मिटकरी
“हसन मुश्रीफ यांना कागलच्या बाहेरचे काही समजत नाही”
राज्यातील करोना निर्बंधावरून ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली होती. हा संदर्भ घेऊन चंद्रकांत पाटील म्हणाले, “हसन मुश्रीफ यांना कागलच्या बाहेरचे काही समजत नाही. राज्यात करोना नियंत्रणाबाबत एकसूत्री कारभाराचा अभाव आहे. शाळा सुरू ठेवायच्या, बंद करायच्या की ऑनलाइन सुरु ठेवायच्या याबाबतही समन्वय नाही. यावर भाजपचा आक्षेप आहे.”