भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील महाविकासआघाडी सरकारवर पुन्हा एकदा जोरदार टीका केली आहे. करोना महामारीत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना राज्य सरकारने केवळ मदत जाहीर केली, मात्र प्रत्यक्षात कुणालाही मदत मिळाली नाही. असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. तसेच, विविध मुद्य्यांवरून न्यालयाकडून राज्य सरकारवर ताशेरे ओढले जात असल्याच्या पार्श्वभूमीवर देखील चंद्रकांत पाटील यांनी निशाणा साधला आहे.

“न्यायालयाने मविआ सरकारला कितीही फटकारले तरीही गेंड्यालाही लाज आणेल इतक्या निब्बर कातडीच्या या सरकारवर त्याचा जराही परिणाम होत नाही.” असं चंद्रकांत पाटील यांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे.

तसेच, “संवेदनाशून्य मविआ सरकारने करोनासारख्या भीषण संकटात महाराष्ट्राला वाऱ्यावर सोडले, यामुळे महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेची अतोनात परवड झाली. या सरकारच्या ढिम्म कारभारामुळेच महाराष्ट्रातील १ लाख ४० हजारांपेक्षा अधिक नागरिक करोनाला बळी पडले; परंतु सरकारला याची जराही लाज वाटत नाही.” असं देखील चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

“करोनामुळे निधन पावलेल्या मृतांच्या कुटुंबियांना ५० हजार रुपये देण्याचा आदेश झाला आहे, अशा मदतीसाठी तब्बल ३७ हजार गरजू कुटुंबांनी राज्य सरकारकडे अर्ज दाखल केले आहेत. बोलघेवड्या मविआ सरकारने केवळ दाखवण्यापुरती मदत जाहीर केली, परंतु कोणालाही प्रत्यक्षात मदत केली नाही.” असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारवर केलेला आहे.

याचबरोबर, “इतर अनेक प्रकरणांप्रमाणेच आता सर्वोच्च न्यायालयाने याही बाबतीत ढिम्म सरकारवर ताशेरे ओढले आहेत, पण कुठल्याही बाबतीत न्यायालयाने मविआ सरकारला कितीही फटकारले तरीही गेंड्यालाही लाज आणेल इतक्या निब्बर कातडीच्या या सरकारवर त्याचा जराही परिणाम होत नाही.” असं चंद्रकांत पाटील ट्विटद्वारे म्हणाले आहेत.

Story img Loader