महागाई भत्त्यात वाढ आणि त्यानंतर एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीन करण्याच्या मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या संपामुळे सणासुदीच्या काळात प्रवाशांचे हाल होत आहेत. त्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत औद्योगिक न्यायालयाने दिलेल्या निर्देशाची मुंबई उच्च न्यायालयानेही गंभीर दखल घेतली आहे. न्यायालयाने मनाई करूनही राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी माघार घेतलेली नसून, संप चिघळला आहे. त्यानंतर आता भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत शरद पवारांनी केलेल्या प्रतिक्रियेवर भाष्य केले आहे.

शरद पवार यांनी बारामती येथे पत्रकार परिषदेत एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत भाष्य केले आहे. “एसटी संघटनेतील व्यक्ती मला भेटले होते. त्यांनी हा संप पुढे न्यायचा नाही हे सांगितले होते. दिवाळीच्या काळात नागरिकांना त्रास देणे योग्य नाही अशी आमची भूमिका आहे. काही लोकांनी टोकाची भूमिका घेतली आहे म्हणून हे घडत आहे. ८० ते ८५ टक्के एसटी रस्त्यावर धावत आहेत. एसटी कर्मचाऱ्यांना माझे आवाहन आहे की संस्थेच्या हितासाठी आणि नागरिकांच्या सुविधेसाठी हे योग्य होणार नाही. कोर्टाने सुद्धा हा संप कायदेशीर नाही अशा प्रकारच्या निष्कर्षाची भूमिका घेतली आहे. त्यामुळे कोर्टाचा आदर ठेवावा आणि हा विषय संपवावा,” असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

त्यावर चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “एसटी कर्मचाऱ्यांना १७ महिन्यांचे पगार मिळालेले नाहीत ते आधी द्या. कर्मचाऱ्यांना अडीच हजार रुपये बोनस दिला आहे. घरातल्या काम करणाऱ्या व्यक्तीला सुद्धा आपण पाच हजार रुपये देतो. २९ आत्महत्या झाल्या आहेत. कोविडमध्ये एसटी नसती तर महाराष्ट्राला अर्धांगवायू झाला असता. अशा एसटी कर्मचाऱ्यांना ५० लाखांचा नियम असताना पाच लाख द्यायचे. आतापर्यंत झालेल्या आत्महत्या वाढवायच्या आहेत का? एसटी कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्यांसाठी भाजपा ताकदीने त्यांच्या मागे उभी आहे,” असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

“कर्मचाऱ्यांना आंदोलन करण्याची हौस आलेली नाही. दिवाळीचा तिसरा दिवस उजाडला तरीही सरकार कोणत्याही मागण्या मान्य करत नाही. शरद पवार केव्हापासून सरकारच्या वतीने घोषणा करायला लागले? सरकारच्यावतीने घोषणा उद्धव ठाकरेंनी करायला हव्यात. का मुख्यमंत्री बदलेले आहेत?,” असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

Story img Loader