पेट्रोल आणि वाढलेल्या डिझेलच्या किमतींमुळे हैराण झालेल्या लोकांना दिवाळीपूर्वी केंद्र सरकार तसेच काही राज्य सरकारांकडून मोठी भेट मिळाली आहे. केंद्र सरकारने बुधवारी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात करण्याचा निर्णय घेतला. केंद्राने पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात पाच रुपये, तर डिझेलवरील शुल्कात दहा रुपये कपात केली आहे. केंद्राच्या निर्णयानंतर देशातील काही राज्यांनी राज्य सरकारकडून इंधनावर आकारला जाणार व्हॅट (मूल्यवर्धित कर) कमी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्या राज्यांमध्ये इंधनदरात कपात झाली आहे.
केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केल्यानंतर आता भाजपा नेत्यांकडून बिगरभाजप राज्यांमधील सरकारवरील दबाव आणला जात आहे. केंद्र सरकारप्रमाणे राज्यातील सरकारनेही इंधनावरील कर कधी कमी करणार असा सवाल भाजपा नेत्यांकडून विचारण्यात येत आहे. महाराष्ट्रातही भाजपा नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारला याबाबत विचारण केली आहे. तर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी इंधनावरील दर कमी करण्याची महाराष्ट्र सरकारची दानत नाही असे म्हटले आहे. टीव्ही ९ सोबत बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
“केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केल्यानंतर त्यांचे दर कमी होतील. केंद्राने केल्यानंतर महाराष्ट्राने दरामध्ये कपात करण्याची काही परंपरा नाही. केंद्र सरकारने उत्पादन शुल्कात कपात केल्यानंतर पेट्रोल आणि डिझेल स्वस्त झाले तसे आपणही करु अशी महाराष्ट्र सरकारची दानत नाही. त्यामुळे मी काही आशावादी नाही,” असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.
“१०० टक्के माझी खात्री आहे की राज्य सरकार याबाबत सकारात्मक भूमिका घेणार नाही कारण त्यांना फक्त केंद्राकडे बोट दाखवायला येते. स्वतःची जबाबदारी त्यांना कळत नाही. केंद्राने कर कमी केल्यानंतरही महाराष्ट्र सरकार पेट्रोल डिझेलवरील व्हॅट कमी करून दिलासा देईल असे मला वाटत नाही,” असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
याआधी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी इंधरदर कपातीवरुन केंद्र सरकारवर टीका केली होती. मन मोठं असण्यासाठी आधी मन असावे लागते. किमान २५ रुपये इंधन कपात कराला हवी होती आणि त्यानंतर ५० रुपये. १०० रुपये वाढवायचे आणि पाच रुपये कमी करायचे हे कसलं मोठं मन? मग दरवाढ केली हे सुद्धा मन मोठे असण्याचे लक्षण आहे का? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.