काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरूरमधील खासदार अमोल कोल्हे हे भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. अमोल कोल्हेंच्या एका भाषणाच्या क्लिप्स व्हायरल करून ते भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर त्यांनी चुकीचा अर्थ काढू नये, असं स्पष्टीकरणही दिलं होतं. मात्र, आता भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि विद्यमान राज्य कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विधानामुळे पुन्हा एकदा अमोल कोल्हेंच्या नावाची चर्चा होऊ लागली आहे.

नेमकं काय घडलं?

अमोल कोल्हेंनी फेब्रुवारी महिन्यात नागपुरात झालेल्या एका सभेत राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांचं प्रचारचिन्ह शिट्टी फुंकून अप्रत्यक्षपणे त्यांचा प्रचार केल्याचा दावा करण्यात आला होता. त्यापाठोपाठ अमोल कोल्हेंनी त्यावर स्पष्टीकरण देऊन कोणताही गैरसमज करून न घेण्याचं आवाहनही केलं होतं. त्यानंतर आता चंद्रकांत पाटील यांनी साम टीव्हीला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये केलेल्या वक्तव्यामुळे शिरूरमधील राजकीय समीकरणं खरंच बदलणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे.

काय म्हणाले चंद्रकांत पाटील?

चंद्रकांत पाटील यांनी या मुलाखतीमध्ये शिंदे गट आणि भाजपामध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला काय असेल, याविषयी भाष्य केलं. “सध्या शिंदे गटाकडे ३९ अधिक १० म्हणजेच ४९ संख्याबळ आहे. विधानसभा निवडणुकीत त्यांना तेवढ्यावरच थांबवायचं असा कोणताही विषय कुणाच्याही डोक्यात नाही. बावनकुळेंनाही तसं म्हणायचं नव्हतं. पण त्यावर आत्ताच निर्णय घेता येणं शक्य नाही. सर्वे होतील, बैठका होतील, मतमतांतरं होतील, नवीन माणसं येतील”, असं पाटील म्हणाले.

“लोकसभा मार्चमध्ये सुरू होऊन सहा टप्प्यात होणार असेल, तर जानेवारी महिन्यात त्याची चर्चा सुरू होईल. उदाहरणार्थ हातकणंगले किंवा शिरूरसारख्या मतदारसंघांचं काय करायचं असे विषय चर्चेला येतील. त्यामुळे आत्ता शिरुरचं काय करायचं हे कसं ठरवणार? गेल्या वेळी तिथून आढळराव पाटील लढले. २०१९ला तिथे आढळरावांना पाडून अमोल कोल्हे खासदार झाले. पण समजा अमोल कोल्हेंना लोकसभा निवडणुकीच्या चार महिने आधी असं वाटू शकतं की आपण भाजपात जावं. मग विद्यमान खासदार म्हणून त्यांनाच तिकीट द्यावं लागेल. ते ठीक आहे. पण मग विषय येईल की ते कुणाकडून लढणार? शिंदेंकडून की भाजपाकडून? मग त्यांना विचारलं जाईल”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

“बाळासाहेब ठाकरे सुद्धा अश्रू ढाळत असतील…”, नवनीत राणांच्या या विधानावर ठाकरे गटाचं प्रत्युत्तर; मनीषा कायंदे म्हणतात…

अमोल कोल्हे भाजपात आले तर?

दरम्यान, अमोल कोल्हे भाजपात आले, तर पुढे काय होणार? याविषयी चंद्रकांत पाटील यांनी संकेत दिले आहेत. “अढळरावांसारखा तीन टर्मचा खासदार असतानाही उद्या कोल्हे भाजपात येणार असले, तर आढळरावांना समजावलंच जाईल की कोल्हे विद्यमान खासदार आहेत. पण मग कोल्हेंना निर्णय घ्यावा लागेल की त्यांनी एकनाथ शिंदेंकडून निवडणूक लढवायची की भाजपाकडून लढायची?” असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

नागपुरात शिट्टी वाजवल्यानंतर चर्चांना उधाण, भाजपात प्रवेश करणार का? अमोल कोल्हे म्हणाले…

“लोकसभा निवडणुकीची चर्चा डिसेंबरमध्ये सुरू होईल”

दरम्यान, लोकसभा निवडणुकीसंदर्भातल्या सगळ्या चर्चा डिसेंबरमध्ये सुरू होतील, असं पाटील म्हणाले आहेत. “लोकसभेसंदर्भातले सगळे विषय डिसेंबर-जानेवारीमध्ये सुरू होतील. विधानसभेचे विषय तर लोकसभेच्याही निकालांनंतर सुरू होतील”, असं पाटील म्हणाले.

Live Updates