उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात असलेल्या जरंडेश्वर साखर कारखान्यावर ईडीने जप्तीची कारवाई केली. या कारवाईवरून राज्यातील राजकारण तापलं. त्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे घोटाळ्यांचा आरोप झालेल्या साखर कारखान्यांची यादीच सोपवली आणि चौकशी मागणी केली. या यादीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी खरेदी केलेल्या कारखान्यांचाही समावेश आहे. पाटील यांच्या पत्रानंतर विरोधकांकडून गडकरींच्या कारखान्यांकडे बोट दाखवलं जात असून, त्यावर विधिमंडळाबाहेर माध्यमांशी बोलताना पाटील यांनी भूमिका स्पष्ट केली.
“गेल्या आठवड्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना दोन पत्रं लिहिली होती. त्यातलं एक पत्र होतं वाझेसंदर्भात. सचिन वाझेनं स्वतःच्या हस्तक्षरात एनआयए न्यायालयात जे पत्र दिलं. त्याची सीबीआय चौकशी करा, असं मी म्हणालो होतो. परमबीर सिंगांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राची सीबीआय चौकशी होते. वाझेंनी एनआयए न्यायालयाच्या न्यायाधीशांना लिहिलेल्या पत्रात अनिल परब, अजित पवार यांची नावं त्यात आहेत. त्याची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करणारं पत्र मी दिलं होतं.
दुसरं पत्र जरंडेश्वर साखर कारखाना ईडीने जप्त केल्यानंतर दिलेलं आहे. ज्यात मी म्हटलं होतं की, जरंडेश्वर कारखान्यावरील कारवाई ही हिमनगाचं टोक आहे. पण, सात ते आठ वर्षापूर्वी राज्य सहकारी बँकेने कर्ज दिलेले कारखाने तोट्यात दाखवून, ते लिलावात काढून कमी किंमतीत घेतलेले आणि कितीतरी पटीने कर्ज काढून चालले नाहीत म्हणून विकले. अशा पद्धतीचा मोठा घोटाळा झाला. यासंदर्भात काही वर्षांपूर्वी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल करण्यात आली होती. ज्यात अशा कारखान्यांची यादी दिलेली होती. ती यादी मी अमित शाह यांना दिली आणि त्याची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
यामध्ये दोन कारखाने नितीन गडकरी यांनी विकत घेतलेले आहेत. यासंदर्भात उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल झाली होती, तेव्हा नितीन गडकरी यांनी स्पष्टीकरण दिलं होतं. बँकांनी ठरवून दिलेल्या किमतीपेक्षा कितीतरी जास्त पैसे देऊन हे कारखाने विकत घेतले असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं. त्यावर कर्ज काढलेलं नाही आणि सुरू आहेत, असंही ते म्हणाले होते. त्यामुळे यात मी नव्याने काही म्हणालो नाही. यादी देऊन त्या कारखान्यांची चौकशी करा, अशी मागणी केली. त्यामुळे स्वतःचे अपराध वाचवण्यासाठी गडकरी यांचे दोन कारखाने काढून टीव्हीवर दाखवणं बरोबर नाही. ते तर खुल्या मनाने चौकशीला तयार आहेत,” असं चंद्रकांत पाटील म्हणाले.