राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून सध्या भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या महिला आघाडीच्या नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगला आहे. चित्रा वाघ यांच्या ट्वीटवर रुपाली चाकणकर यांनी देखील थेट टीका न करता अप्रत्यक्ष शब्दांतच निशाणा साधला आहे. या ट्वीटची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. यात आता भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी चित्रा वाघ यांची बाजू घेत प्रतिक्रिया दिली आहे.
“चित्राताई वाघ यांनी त्यांच्या जुन्या अनुभवातून टीका केली असेल. पण उशिरा का होईना महिला अध्यक्ष नेमत आहेत, हे चांगलं आहे. रुपालीताई कशा आहेत हे चित्राताई वाघ यांना माहिती असणार. यामुळे त्यांनी तसं ट्विट केलं असेल.”, असं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.
“राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी रावणाला मदत करणारी शुर्पणखा बसवू नका” असं ट्वीट चित्रा वाघ यांनी केलं होतं. हा अप्रत्यक्षपणे रुपाली चाकणकर यांनाच टोला असल्याचं बोललं गेलं. त्यावर रुपाली चाकणकर यांनी प्रत्युत्तर देखील दिल्यानंतर आता चित्रा वाघ यांनी स्वत:च आपल्या ट्वीटबद्दल खुलासा केला आहे. चित्रा वाघ यांच्या ट्वीटवर रुपाली चाकणकर यांनी देखील थेट टीका न करता अप्रत्यक्ष शब्दांतच निशाणा साधला आहे. “करोनाच्या पार्श्वभूमीवर खूप मोठे प्रश्न आहेत. आत्ता कुठे राज्यातली जनता सावरतेय. अनेक मोठे प्रश्न असताना इतर क्षुल्लक गोष्टींवर लक्ष द्यायला वेळ नाही. एक जबाबदार नागरीक म्हणून आपली भूमिका निभावणं महत्त्वाचं आहे”, असं रुपाली चाकणकर म्हणाल्या. मात्र, या सर्व वादावर स्पष्टीकरण देताना चित्रा वाघ यांनी आपण ट्वीटमध्ये रुपाली चाकणकर यांचं नावच घेतलं नव्हतं, असं स्पष्टीकरण दिलं आहे.