Chandrakant Patil On Maharashtra, Assembly Election 2024 : विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळालं तर महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर राज्यात महायुतीचं सरकार स्थापन होणार आहे. सरकार स्थापनेसाठी सध्या महायुतीच्या नेत्यांमध्ये हालचाली सुरु आहेत. खरं तर २३ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. त्यानंतर आज पाच दिवस उलटूनही राज्यात सत्तास्थापन झालेली नाही. सरकार स्थापनेसाठी मोठ्या हालचाली सुरु आहेत. पण अद्याप ठोस कोणताही निर्णय झालेला नाही. आधी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदावर दावा केल्याची चर्चा होती. मात्र, त्यानंतर पत्रकार परिषद घेत एकनाथ शिंदे यांनी भाजपाचे दिल्लीतील नेते जो निर्णय घेतील तो आपल्याला मान्य असेल अशी भूमिका जाहीर केली.
दुसरीकडे अजित पवारांनीही आपलीही अशीच भूमिका असल्याचं स्पष्ट केलं. त्यानंतर दिल्लीत देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याबरोबर भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक पार पडणार आहे. त्यामुळे या बैठकीनंतर कोणता ठोस निर्णय होतो हे समोर येईल. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदावरील दावा सोडल्यानंतर भाजपाकडून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा मार्ग मोकळा झाल्याचं बोललं जात आहे. मात्र, तरीही भारतीय जनता पक्षाने अद्याप अधिकृत कोणतीही घोषणा केलेली नाही. त्यामुळे नेमकी मुख्यमंत्री पदी कोणाची वर्णी लागणार? याकडे अनेकांचं लक्ष लागलेलं आहे.
हेही वाचा : महाराष्ट्रातील सत्तास्थापनेवर अजित पवारांचं मोठं विधान; म्हणाले, “एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री…”
यातच महायुतीमधील काही नेत्यांकडून सूचक विधाने करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर आज भारतीय जनता पक्षाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी एक सूचक विधान केलं आहे. “भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असतं”, असं मुख्यमंत्रिपदाच्या चर्चांवरील प्रश्नावर बोलताना चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
चंद्रकांत पाटील काय म्हणाले?
“भारतीय जनता पक्ष नेहमीच नवीन नेतृत्व शोधत असते. पक्ष हा प्रयोग त्या-त्या राज्यातील निवडणुकीचे तिकीटे घोषित करत असताना करत असतो. नवीन नेतृत्व समोर आलं पाहिजे हा पक्षाचा कायम प्रयत्न असतो. हे आमच्या पक्षाचं वैशिष्टे आहेत. त्यामुळे ते राज्यस्थान आणि मध्य प्रदेश प्रमाणे प्रयोग महाराष्ट्रात करणार आहेत की नाही हे मला माहिती नाही”, असंही चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं. दरम्यान, राज्यस्थान आणि मध्य प्रदेश प्रमाणे महाराष्ट्रात प्रयोग करणार आहेत की नाही हे आपल्याला माहिती नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे त्यांच्या विधानाचा नेमकी अर्थ काय? याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहेत.