अलीकडं महाराष्ट्रात नव्या पालकमंत्र्यांची नियुक्ती करण्यात आली. त्यात पुण्याच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील यांच्याऐवजी अजित पवार यांची नियुक्ती झाली. यानंतर पहिल्यांदाच चंद्रकांत पाटलांनी पालकमंत्रीपदावरून खदखद व्यक्त केली आहे. पालकमंत्री म्हणून मला अतिशय जवळचे जिल्हे देण्यात आले. गेल्या चाळीस वर्षांत नवीन काही आलं की, माझ्या डोक्यावर टाकलं जातं, असं विधान चंद्रकांत पाटलांनी केलं आहे.

पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, “पालकमंत्री म्हणून मला अतिशय जवळचे जिल्हे देण्यात आले. सोलापूर दहा किलोमीटवर, तिथून अमरावती पाच किलोमीटर, अर्धा किलोमीटरवर पुणे आणि मंत्रीमंडळ बैठकीसाठी मुंबईला जायला शून्य किलोमीटर… गेल्या चाळीस-पंचेचाळीस वर्षांत माझं असं झालंय की, नवीन काही आलं, तर माझ्या डोक्यावर टाकलं जातं.”

हेही वाचा : अग्रलेख: भाजपचे बालक-पालक!

दरम्यान, अजित पवार सत्तेत सामील झाल्यापासून पुण्याचे पालकमंत्रीपद बदलाची चर्चा सुरू होती. अशात काही दिवसांपूर्वीच चंद्रकांत पाटलांकडील पालकमंत्रीपद काढून घेण्यात आलं. अजित पवारांकडे पुण्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली. तर, चंद्रकांत पाटलांना सोलापूर आणि अमरावती या दोन जिल्ह्याचं पालकमंत्री करण्यात आलं. पालकमंत्री बदलानंतर चंद्रकांत पाटील नाराज असल्याच्या चर्चा होत्या.

हेही वाचा : पुणे जिल्ह्यात अजित पवारच ‘दादा’; पालकमंत्रीपदाच्या शर्यतीत चंद्रकांत पाटलांना ठरले वरचढ

सोलापुरात चंद्रकांत पाटलांवर शाईफेक

पालकमंत्री चंद्रकांत पाटील दोन दिवसीय सोलापूर दौऱ्यावर होते. तेव्हा, रविवारी ( १५ ऑक्टोबर ) संध्याकाळी भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी चंद्रकांत पाटलांवर शाईफेक केली. राज्य सरकारच्या कंत्राटी पद्धतीनं नोकर भरतीला विरोध करण्यासाठी ही शाईफेक करण्यात आल्याचं भीम आर्मीकडून सांगण्यात आलं.

Story img Loader