भाजपा नेते तथा राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचं कौतुक केलं आहे. “उद्धव ठाकरे यांची प्रकृती बरी नसतानाही त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या काळात महाराष्ट्रभर फिरून त्यांच्या गटाच्या नऊ जागा निवडून आणल्या”, असं म्हणत पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर स्तुतीसुमनं उधळली आहेत. पाटील म्हणाले, “उद्धव ठाकरे यांनी आमच्याबरोबरची (भारतीय जनता पार्टी) युती तोडली नसती तर राज्यात भाजपा आणि शिवसेनेने पुन्हा एकदा सर्वाधिक जागा जिंकल्या असत्या आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला घरी बसावं लागलं असतं. मात्र उद्धव ठाकरे यांनी युती तोडली. ते महाराष्ट्रभर फिरले आणि याचा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला फायदा झाला.”
चंद्रकांत पाटील म्हणाले, “महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजपाची युती असताना उद्धव ठाकरेंच्या पक्षाला राज्यात २३ जागा मिळाल्या होत्या. त्यापैकी १८ जागांवर त्यांचे उमेदवार जिंकले होते. यंदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीत सर्वात जास्त कष्ट कोणी घेतले असतील तर ते केवळ उद्धव ठाकरे यांनी घेतले. ते आमचे मित्र असल्यामुळे मला त्यांची काळजी वाटायची. कारण आपल्यापैकी अनेकांना आजारपणं असतात, तशी त्यांचीही काही आजारपणं आहेत. त्यावर मात करून ते महाराष्ट्रभर फिरले. या मेहनतीचं फळ म्हणून त्यांचे नऊ खासदार निवडून आले.”
राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री म्हणाले, “२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनतेने शिवसेना-भाजपा युतीच्या बाजूने कौल दिला होता. तेव्हा जर आमचं युतीचं सरकार आलं असतं तर आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवाल्यांना घरी बसावं लागलं असतं. मात्र यावेळी त्यांचे १३ (काँग्रेस) आणि आठ (शरद पवार गट) खासदार निवडून आले आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी या गोष्टीचं आत्मपरीक्षण करायला हवं. मी काही उद्धव ठाकरेंना सल्ला देणारा माणूस नाही. मात्र सध्याची परिस्थिती पाहता मला वाटतं की त्यांनी आत्मपरीक्षण करून पाहावं की या निवडणुकीतून किंवा युती तोडून त्यांनी काय मिळवलं? त्यांच्या हाती काय लागलं?”
हे ही वाचा >> “सरकार गोड बोलून माझा काटा…”, मनोज जरांगेंचा गंभीर आरोप
भाजपा नेते चंद्रकांत पाटील म्हणाले, “उद्धव ठाकरे यांच्या खासदारांवर अल्पसंख्यांकांच्या मतावर निवडून आलेले असा ठपका बसला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या एका नेत्याने फार चांगली पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं होतं की उद्धव ठाकरे यांचा हा भगवा विजय नसून हा हिरवा विजय आहे. तसेच त्यांच्या खासदारांची संख्या १८ वरून ९ झाली आहे. २०१९ प्रमाणे भाजपा आणि शिवेसना हे पक्ष एकत्र राहिले असते तर आज निवडणुकीच्या निकालाचं चित्र वेगळं असतं, तसेच त्यांच्या पक्षाची वाताहत झाली नसती. मात्र या सगळ्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने भरपूर फायदा करून घेतला.”