भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केलाय. अजित पवारांची कामाची पद्धत ही रोखठोक असते असं मत व्यक्त करताना ते होय तर होय नाही तर नाही असं स्पष्टपणे सांगतात, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. रविवारी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसोबत कोल्हापूरमध्ये बोलताना त्यांनी अजित पवारांना एसटी संप मिटवण्याची विनंती केली असल्याचं सांगत त्यांच्याकडून अपेक्षा असल्याचं सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा अप्रत्यक्षपणे टोला लगावलाय.

नक्की वाचा >> कोल्हापूर पोटनिवडणूक: मोदींच्या नावे लोक BJP ला मतं देतील असा चंद्रकांत पाटलांना विश्वास; म्हणाले, “मोदी माणसांच्या…”

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“मी सभागृहात बसल्या बसल्या अजित पवारांना एक चिठ्ठी लिहिली. श्रेय तुम्ही घ्या पण एसटी कर्मचाऱ्यांचा संप संपवा. मी एका गिरणी कामगाराचा मुलगा आहे. माझे वडील गिरणी कामगार होते. माझी आई कामगार होती. दत्ता सामंतांच्या संपामध्ये एक लाख घरं उद्धवस्त झाली, हे मला आजही आठवतं. ही एक लाख घरं पुन्हा उद्धवस्त होतील. म्हणून मी अजित पवारांना लिहिलं कारण त्यांच्याकडूनच आशा आहेत,” असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

मात्र अजित पवारांसाठी हे उद्गार काढल्यानंतर चंद्रकांत पाटलांनी, “लगेच याचा अर्थ लावू नका की अजित पवार बाहेर पडणार आहेत आणि भाजपा, अजित पवारांचा संसार आहे. पण अजित पवारांमध्ये ही धमक आहे,” असंही म्हटलं. पुढे बोलताना, “काल परवापासून माझ्या चिठ्ठीमुळे की काय माहिती नाही पण त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांशी संवाद साधण्यास सुरुवात केलीय,” असंही त्यांनी सांगितलं.

नक्की वाचा >> “मला उद्धव ठाकरेंची कुंडली पहायची आहे, काय भाग्यवान…”; चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य

तसेच अजित पवारांचं ऐकून एसटी कर्मचारी कामावर येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. “दादांची स्टाइल कशी असते की, हे ३१ तारखेपर्यंत जॉइन व्हा नंतर परत संधी मिळणार नाही अशी. दादांना मी एवढचं म्हणेन की प्रेमाने घ्या, चार महिने संपग्रस्त आहेत. तुम्ही प्रेमाने बोललात, तुम्ही आश्वासन दिलं की तुम्ही चला सगळे कामावर, मी आहे सातवा वेतन आयोग देतो, सगळे येतील,” असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

नक्की वाचा >> “महाराष्ट्राचं सरकार राष्ट्रवादी चालवतंय, शिवसेना आणि काँग्रेसच्या आमदारांनी, नेत्यांनी फक्त…”; चंद्रकांत पाटलांचा टोला

यावर पत्रकारांनी हा मुख्यमंत्र्यांना तुमचा चिमटा आहे असं म्हणायचं का?, असा प्रश्न विचारला असता त्यावरही चंद्रकांत पाटलांनी उत्तर दिलं. “वस्तूस्थिती ही आहे की आधी उद्धवजींना कोव्हीडमुळे शक्य नव्हतं, आता आजारपणामुळे शक्य नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला त्यांची कुंडली बघायची आहे. काय भाग्यवान माणूस जन्माला आलेला आहे. कशाचंच सोयरसूतक नाही. पण कोणी त्यांना आडवूच शकत नाही. सगळ्यांची ती मजबुरी आहे. आता ठीक आहे एक एकाचं भाग्य असतं. पण प्रश्न तर सुटले पाहिजेत. प्रश्न एकनाथ शिंदे सोडवू शकतात, अजित पवार सोडवू शकतात. लोक त्यांच्याकडे जातात,” असा टोला चंद्रकांत पाटलांनी लागवला आहे.

नक्की वाचा >> “किरीट सोमय्या भ्रष्टाचाऱ्यांचा कर्दनकाळ, महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी…”; चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया

पुढे बोलताना, “शिवसेनेचा एक आमदार मातोश्रीवर जाण्याचा प्रयत्न करत नाही. वेळच दिला जात नाही तिथून तर ते एकनाथ शिंदेंकडे जातात. सगळे आमदार अजितदादा कुछ करो असं म्हणतात. अजितदादांना हो तर हो, नाही तर नाही म्हणता येतं ही वस्तूस्थिती आहे. परवा त्यांनी सभागृहामध्ये अप्रत्यक्षपणे सांगितलं की वाईनचा निर्णय आम्ही गुंडाळत आणायलाय. हे धाडस फक्त दादांमध्ये बाकीचे हेकट आहेत,” असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.

तसेच, “महाविकास आघाडीचे महान नेते काहीही करतो. पण या सगळ्या तपास यंत्रणांची स्वायत्तता आहे. ते का करणार आहेत, काय केलं आहे हे सांगत नाहीत. त्यांनी सांगण्याचं काही कारणच नाही ना कारण आपण अथॉरिटी नाही. त्यांना डायरी सापडली का, नोंद सापडली का मला काही माहिती नाही. मला एवढचं दिसतंय की खूप काहीतरी होणार आहे,” असंही चंद्रकांत पाटील म्हणाले. मातोश्रीचा उल्लेख असणाऱ्या डायरीची ईडीकडून चौकशी व्हावी अशी मागणी अतुल भातखळकरांनी केलीय, असं म्हणत प्रश्न विचारण्यात आला असता चंद्रकांत पाटलांनी, “ही मागणी योग्यच आहे. या चौकशीमधून आता कोणी सुटत नाही. माझी चेष्टा केली जाते राऊतांकडून. ही सगळी चेष्टा अंगावर येणार आहे. मी जे जे म्हणतोय ते खरं ठरत चाललंय. मी असं म्हटलं की काही जात्यात आहेत काही सुपात आहेत. जात्यातल्यांचं पीठ झालं तर सुपातले जात्यात जायला लागलेत, एवढच मला म्हणायचं आहे,” अशी प्रतिक्रिया दिली.