निजामाविरूद्ध शिवरायांनी स्थापलेल्या हिंदवी स्वराज्याचा विराट विजय झाला ती पावनभूमी म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड येथील शिवपट्टण अर्थातच खर्ड्याचा भुईकोट किल्ला. या किल्ल्याचं ऐतिहासिक महत्त्व ओळखून या परिसराला नवी ओळख देण्याचा संकल्प आमदार रोहित पवार यांनी केला आहे. याच प्रेरणेतून किल्ल्याच्या आवारात भव्य ध्वजस्तंभ साकार होत असून त्यावर देशप्रेमाची असीम ऊर्जा देणारा ७४ मीटर उंचीचा शौर्याचं प्रतिक असा भव्य-दिव्य भगवा स्वराज्य ध्वज फडकवण्यात येणार आहे. याची जोमात तयारी देखील सुरु आहे.
दरम्यान, यावर राजकारण देखील पहायला मिळत आहे. रोहित पवार यांच्यावर टीका देखील होत आहे. या टीकाकारांवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे. रोहित पवार भगवा ध्वज उभारत असतील तर कुणाच्या पोटात का दुखत, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. या प्रश्नावर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांच पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
चंद्रकांच पाटील म्हणाले, “भगवा ध्वज हा मुळात कुणा पक्षाचा नाही आहे. जरी शिवसेनेचा हा पक्ष ध्वज असला तरी भगवा ध्वज हे हिंदू धर्माचं, वारकऱ्यांच आणि संतांचं प्रतीक आहे. तो कुणाचा ध्वज नाही आहे. त्यामुळे रोहित पवारांनी जो ध्वज लावला तो शिवसेनेचा लावला की हिंदू धर्माचं प्रतीक म्हणून लावला हा शोधण्याचा विषय आहे. या देशातील वाद हिंदुत्व माननं आणि न माननं ऐवढाच मर्यादित राहिलेला आहे. ते जर हिंदुत्व मानत असतील तर आनंद आहे.
दरम्यान, खर्ड्याच्या ऐतिहासिक शिवपट्टण किल्ल्यात उभारण्यात येणाऱ्या विक्रमी उंचीच्या भगव्या ‘स्वराज्य ध्वज’ उभारणीच्या उपक्रमास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.