सांगली : राज्यात सध्या सर्वांत ज्येष्ठ मंत्री मी आहे. राज्य मंत्रिमंडळात महत्त्वाच्या सर्व खात्यांचे मंत्रिपद मी भूषवले आहे. आता केवळ गृह खाते शिल्लक राहिल्याची खंत राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री तथा सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी तासगाव येथे एका कार्यक्रमात व्यक्त केली. या वेळी आ. गोपीचंद पडळकर, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख हे उपस्थित होते.
पाटील म्हणाले, की मी राज्य मंत्रिमंडळात अनेक महत्त्वाची खाती सांभाळली आहेत. सरकारमध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. आता केवळ गृह खात्याचा पदभार हाती येणे बाकी उरले आहे. सध्या राज्याचे गृहखाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असल्याने मंत्री पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय क्षेत्रात लगेच चर्चा सुरू झाली आहे. पालकमंत्री या नात्याने पाटील दर आठवड्यास सध्या सांगली दौरा करतात. या दौऱ्यात जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठक झाल्यानंतर त्यांचे दौरे प्रामुख्याने विविध नेत्यांच्या भेटीगाठी घेण्यासाठी असतात. नेत्यांच्या निवासस्थानी जाऊन ते भेटी घेत असतात.
गटबांधणीसाठी प्रयत्न
जिल्ह्यात आपला गटबांधणीसाठी त्यांचे प्रयत्न सुरू असून, याचाच एक भाग म्हणून त्यांनी नुकतीच काँग्रेसचे सहयोगी असलेले अपक्ष खासदार विशाल पाटील यांचीही भेट घेत त्यांना भाजपप्रवेशाचे निमंत्रण दिले. यावर खा. पाटील यांनी सध्या जरी शब्द दिलेला नसला तरी आमचे प्रयत्न सुरूच राहतील, असे चंद्रकांत पाटील यांनी या भेटीनंतर सांगितले. दरम्यान, याच वेळी माजी खासदार संजयकाका पाटील यांच्या भाजप प्रवेशाबाबत मात्र पालकमंत्री अद्याप आपला होकार देत नसल्याने त्याचीही चर्चा रंगलेली आहे. संजयकाका पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे नेते असल्याने त्यांचे राजकीय पुनर्वसन उपमुख्यमंत्री अजित पवारच करतील, असे सांगत त्यांच्या भाजप प्रवेशाला अप्रत्यक्ष विरोध दर्शवला आहे.