लोकसत्ता प्रतिनिधी
सांगली : अमली पदार्थ प्रतिबंधक उपाययोजनांची कडक अंमलबजावणी करावी. अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सने कायद्याचा धाक निर्माण करावा. अमली पदार्थ लागवड, वाहतूक, विक्री व तस्करी करणार्यांची कसलीही गय करू नये, असे निर्देश राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी दिले.
अमली पदार्थ टास्क फोर्सच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक सभागृहात आयोजित या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळच्या प्रादेशिक अधिकारी वसुंधरा बिरजे, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे आदि उपस्थित होते.
अमली पदार्थ प्रतिबंधक उपाययोजनांसाठी पालकमंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अमली पदार्थ प्रतिबंधक उपाययोजना समिती (टास्क फोर्स) स्थापन करण्यात आली असून, या टास्क फोर्समध्ये जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक, एम. आय. डी. सी. च्या प्रादेशिक अधिकारी, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक, सहाय्यक आयुक्त, औषध विभाग हे सदस्य आहेत. या टास्क फोर्सच्या कामगिरीचा पालकमंत्री दर आठवड्याला आढावा घेणार आहेत.
पालकमंत्री म्हणाले, अमली पदार्थांच्या दुष्परिणामसंदर्भात सार्वजनिक ठिकाणी जनजागृती करावी. त्यासाठी अमली पदार्थांचे दुष्परिणाम सांगणारी लघुचित्रफीत तयार करावी. शाळा महाविद्यालयातील मुले, युवकांना अमली पदार्थांचे दुष्परिणाम समजून सांगावेत, जेणेकरून भावी पिढी यापासून दूर राहू शकेल. आगामी कालावधीत आपण वैयक्तिकरीत्या शाळा महाविद्यालयांना भेट देऊ, असे ते म्हणाले.
पोलिस दलाने गस्त वाढवावी. गोपनीय खबर मिळण्याचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत. अमली पदार्थ विरोधी कारवाई केल्यानंतर अशा खटल्यात कोणतीही त्रृटी ठेवू नका. अमली पदार्थ तस्करांना कडक शिक्षा होण्यासाठी जास्तीत जास्त पुरावे गोळा करा. त्याचबरोबर माहिती देणार्यांना सुरक्षा द्यावी, असे निर्देश त्यांनी दिले.