महाराष्ट्रभर शाळा, महाविद्यालयांचे जाळे असलेल्या स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती झाल्याने भाजपची पावले आता राजकारण, सहकाराकडून शिक्षण क्षेत्राच्या दिशेने पडू लागली आहेत.

राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रात रयत शिक्षण संस्था आणि स्वामी विवेकानंद या दोन शिक्षण संस्था मातब्बर आणि विस्ताराने मोठय़ा मानल्या जातात. या दोन्ही संस्थांवर आजवर काँग्रेस विचाराच्या नेत्यांचाच वरचष्मा राहिला होता. रयतेचे अध्यक्षपद राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे असून ‘स्वामी’चे नेतृत्व राष्ट्रवादीचेच आर. आर. पाटील  करत होते. त्यांच्या निधनानंतर संस्थेची धुरा चंद्रकांत पाटलांकडे आली आहे.

हा नेतृत्वबदल केवळ व्यक्तीपातळीवरचा नसून तो पक्षीय पातळीवरचाही मानला जात आहे. सध्या राज्य आणि केंद्रात दोन्हीकडे भाजपची सत्ता असल्याने चंद्रकांत पाटील यांची झालेली नियुक्ती ही त्यादृष्टीनेच ‘सोयी’ची म्हणून झाल्याचे बोलले जात आहे.

संस्थेचे महत्त्व

स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची केवळ पश्चिम महाराष्ट्रच नव्हे तर कोकण, मराठवाडा, विदर्भामध्ये विद्यालये, महाविद्यालये, आश्रमशाळा कार्यरत असून लाखो कर्मचारी यामध्ये कार्यरत आहेत. संस्थेचे मुख्यालय कोल्हापूर असले तरी १९५४ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेच्या राज्यभरात ३७३ शाळा, महाविद्यालये, आश्रमशाळा कार्यरत आहेत. या संस्थेचे अध्यक्ष नामधारी असले तरी आतापर्यंत अध्यक्षपदासाठी वसंतदादा पाटील यांच्यानंतर दादा घराण्यातीलच प्रकाशबापूंना संधी देण्यात आली होती. त्यांच्या पश्चात ही संधी तत्कालीन गृहमंत्री आर. आर. आबा पाटील यांना देण्यात आली. संस्थेने आतापर्यंत सत्तेच्या वर्तुळात असलेल्यांनाच अध्यक्षपदाची संधी दिली आहे.

Story img Loader