कोल्हापूर विधानसभा पोटनिवडणुकीची घोषणा होताच जिल्ह्यातलं राजकीय वातावरण तापू लागलं आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील उर्फ बंटी पाटील यांच्यामध्ये थेट आमने-सामने खडाखडी होऊ लागली आहे. शनिवारी माध्यमांशी बोलताना बंटी पाटील यांनी चंद्रकांत पाटलांच्या आरोपांवर परखड शब्दांमध्ये टीका केली होती. त्यावरून आता भाजपा प्रदेशाध्यक्षांनी देखील प्रत्युत्तर देताना बंटी पाटील यांना समोरून वार करण्याचं थेट आव्हान दिलं आहे.
नेमकं बिनसलं कुठे?
चंद्रकांत पाटील यांनी विधिमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सतेज पाटील यांनी घरफाळा चुकवल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. मात्र, हा आरोप चुकीच्या आणि अपुऱ्या माहितीच्या आधारावर केला गेल्याचा प्रतिहल्ला सतेज पाटील यांनी केला होता. “घरफाळ्याची थकबाकी असती, तर विधानपरिषद निवडणुकीच्या छाननीमध्ये आपला अर्ज बाद झाला असता. पण तसं नसल्याने तो वैध ठरला. त्यामुळे कुणाचंतरी ऐकून आरोप करणारे चंद्रकांत पाटील एवढे अपरिपक्व नेते असतील, असं वाटलं नव्हतं”, असं सतेज पाटील म्हणाले.
“टोपी फेकली आणि व्यवस्थित बसली”
दरम्यान, सतेज पाटील यांच्या प्रत्युत्तरानंतर त्यावर चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा टीकास्त्र सोडलं आहे. “माजी महापौर सुनील कदम यांनी इथल्या एका राजकीय नेत्याच्या मालमत्तेतील अनियमिततेचा विषय माझ्याकडे दिला. मी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला. मी कुणाचं नाव घेतलं नाही. पण टोपी फेकली आणि ती व्यवस्थित बसली”, असा टोला पाटील यांनी लगावला.
“पाटीलसाहेब, धमकीची भाषा करू नका”
“मला आठ खाती असल्यामुळे १३ आयएएस अधिकारी होते. पाच वर्ष काम केल्यानंतर ते दुसऱ्या खात्याकडे जातात. यादव मला ओएसडी होते. पाच वर्षांचं सरकार गेल्यानंतर त्यांची थेट उस्मानाबादला बदली केली. त्यानंतर त्यांनी भेटीगाठी करून ती सांगली करून घेतली. रोज कोल्हापूर-सांगली असं त्यांचं अपडाऊन सुरू आहे. गेल्या अडीच वर्षांत त्यांचा आणि माझा काय संबंध? पाटीलसाहेब, ही धमकीची भाषा करू नका”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
“बंटी पाटील माणसं खाणारा माणूस”, चंद्रकांत पाटलांचं खळबळजनक विधान
“लढाई आमने-सामने होऊ दे”
दरम्यान, यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी आमने-सामने लढाई होऊ द्या, असं आव्हानच बंटी पाटील उर्फ सतेज पाटील यांना दिलं आहे. “तुम्ही म्हणाला आहात की मराठा आहे, समोरून वार करतो. मग माझ्यावर वार करा. मी समर्थ आहे. उगीच यादवांचं नाव घ्यायचं. क्लिप बनवायच्या. बॉम्ब वगैरे. २७ महिन्यात हे सरकार काही करू शकलेलं नाही. पण दोष असेल, तर माझ्यावर आरोप सिद्ध होऊ दे, कारवाई होऊ दे. त्यासाठी यादव-शिंदे मध्ये कशाला पाहिजेत. ही लढाई आमनेसामने होऊ देत. इकडे-तिकडे वार करण्याचं काही काम नाही”, अशा शब्दांत चंद्रकांत पाटील यांनी आव्हान दिलं आहे.