सांगली : कृत्रिम बुद्धिमत्ता हे एक वरदान असून, यामुळे प्रगती साध्य होऊन मानवी जीवन अधिक सुखकर होईल, असे मत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. पाणी पुरवठा आणि सांडपाणी वाहिनीची प्रगत रोबोटिक्स तंत्रज्ञानाने तपासणी करण्यासाठी महानगरपालिकेने खरेदी केलेल्या रोबोटिक तंत्रज्ञानाचे उद्घाटन पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते मिरज येथे करण्यात आले. यावेळी खासदार विशाल पाटील, आमदार इद्रिस नायकवडी, आमदार डॉ. सुरेश खाडे आदींसह वरिष्ठ शासकीय अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री म्हणाले, सांडपाणी वाहिनीमध्ये काही अडथळे निर्माण झाल्यास माणसाला त्यामध्ये आत उतरून काम करावे लागते. तेथील गॅसमुळे माणसाच्या जीवाला धोका पोहोचतो, अशा दुर्दैवी घटना घडतात. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून तयार केलेल्या रोबोटिक्स तंत्रज्ञानामुळे सांडपाणी वाहिनी, जलवाहिनी मधील बिघाड दुरुस्त होणार आहे, असे अद्ययावत तंत्र महापालिकेने आणल्याबद्दल महापालिकेचे त्यांनी अभिनंदन केले.
पाणी पुरवठा व सांडपाणी वाहिनी (ड्रेनेज लाईन) सुस्थितीत ठेवणे व सांडपाणी वाहते करण्याकरिता रोबोटचा उपयोग होणार आहे. पाणी पुरवठा वाहिनीमध्ये अडथळा निर्माण झाल्यामुळे नागरिकांना कमी प्रमाणात पाणी उपलब्ध होते. अशा तक्रारीचे निराकरण करणेसाठी जलवाहिनीमध्ये आतील बाजूस रोबोट जावून लाईनच्या सद्यस्थितीची संपूर्ण माहिती उपलब्ध होते. त्यामुळे जुन्या गळत्या शोधणे व नियमित पाणी पुरवठा कार्यरत ठेवण्यासाठी एन्डोबोट (रोबोट) घेतल्यामुळे लाईन्स खराब होवून खड्डे पडण्याबाबत अगोदरच माहिती मिळणार आहे. त्यामुळे जीवित व वित्तहानी होणार नाही. अद्ययावत तंत्रज्ञानाचे एन्डोबोट (रोबोट) अत्याधुनिक पद्धतीचे असून, महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा व मलनि:सारण विभागाकडे एकूण ६ रोबोट खरेदी करण्यात आले आहेत. त्याची एकूण किंमत ५ कोटी ८३ लाख १५ हजार रुपये इतकी आहे.