भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी गुन्हा दाखल झालेले शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या विरोधात सबळ पुरावे न मिळाल्याने त्यांचं नाव दोषारोपपत्रातून काढून टाकण्यात आल्याची माहिती पुणे ग्रामीण पोलिसांकडून राज्य मानवी हक्क आयोगाला दिली आहे. त्याबाबतचा अहवाल आयोगाकडे सादर करण्यात आला आहे. या प्रकरणावरून आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.
“जाती-जातीमध्ये संघर्ष निर्माण करून त्यांना एकमेकांसोबत लढवायचं हाच उद्योग आयुष्यभर केलेल्या शरद पवारांकडून दुसरी काय अपेक्षा करायची,” अशा शब्दांत चंद्रकांत पाटलांनी शरद पवारांवर टीकास्त्र सोडलं आहे. कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, “शरद पवार यांना आपल्या घरावरील हल्ला रोखता आला नाही. पण तेच भाजपवर उलट सुलट आरोप करत आहेत. त्यांच्या प्रमाणे आम्हीही भीमा कोरेगाव प्रकरणी खूप काही बोलू शकतो. दंगल झाल्यावर पवार यांनी लगेचच पत्रकार परिषद घेऊन मिलिंद एकबोटे आणि भिडे गुरुजींचं नाव घेतलं.”
“प्रत्येक गोष्टीला जातीय रंग देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. पण या प्रकरणात संभाजी भिडे गुरुजींचं नाव आता काढावं लागलं आहे. जाती-जातींमध्ये संघर्ष निर्माण करणं हाच पवार यांचा उद्योग आहे,” अशी टीका चंद्रकांत पाटलांनी यावेळी केली.
खासदार रावसाहेब दानवे यांनी भाजपाचा मुख्यमंत्री ब्राह्मण झाल्याचं पाहायचं आहे, असं विधान केलं होतं. याबाबत प्रश्न विचारला असता पाटील म्हणाले की, दानवे यांनी नेमकं कोणत्या अर्थाने विधान केलं, हे माहीत नाही. मात्र देवेंद्र फडणवीस हे ब्राह्मण असल्याने मुख्यमंत्री झाले असं नाही. तर भाजपमध्ये गुणवत्तेच्या आधारे कामगिरीचं मूल्यमापन करून जबाबदारी आणि पद दिले जातं, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.