सांगली : गुन्हेगारी घटना रोखण्यासाठी दहा हजार लोकसंख्येसाठी लहान पोलीस चौकी निर्माण करावी, अशा सूचना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी दिल्या.सांगली शहर व जिल्ह्यातील गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त पोलीस अधीक्षक रितू खोखर यांच्या नेतृत्वाखाली स्थापन क्राइम टास्क फोर्सच्या कामकाजाचाही आढावा या वेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला. या बैठकीस जिल्हाधिकारी अशोक काकडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, महापालिका आयुक्त शुभम गुप्ता, सांगली शहरच्या पोलीस उपअधीक्षक विमला एम. प्रत्यक्षात व जिल्ह्यातील उपविभागीय पोलीस अधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.
गुन्हेगारी घटना कमी होण्यासाठी, तसेच, गुन्हेगारी घटना घडू नयेत, नागरिकांमध्ये सुरक्षित सांगलीचा आत्मविश्वास निर्माण करावा, असे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘सांगली, मिरजसारख्या शहरात गुन्हेगारी घटना रोखण्यासाठी आवश्यकतेप्रमाणे १० हजार लोकसंख्येच्या परिक्षेत्रासाठी छोट्या चौक्या निर्माण कराव्यात. तिथे गस्तीसाठी तीन पाळ्यांत गृहरक्षक दलाच्या स्वयंसेवकांना नेमावे. त्यांची अदृश्य भीती निर्माण करावी. पोलिसांनी आपले कर्तव्य काटेकोरपणे पार पाडावे. त्यामध्ये येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून मदत घ्यावी. सीसीटीव्ही बसवावेत, असे त्यांनी सूचित केले.
क्राइम टास्क फोर्सच्या कामकाजाचा आढावा दर आठवड्याला घेणार असल्याचे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस उपअधीक्षक यांची बैठक घेऊन वेळोवेळी घटनानिहाय आढावा घ्यावा, असे त्यांनी सांगितले.