राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आजारपणाच्या मुद्द्यावर देखील चर्चा होऊ लागली आहे. काही दिवसांपूर्वी मानेच्या त्रासामुळे उद्धव ठाकरेंवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यानंतर दोन दिवसांपूर्वीच पहिल्यांदा मुख्यमंत्री एका कार्यक्रमानिमित्त बाहेर पडले होते. मात्र, यावरून आता भाजपानं मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. विशेष म्हणजे, यावेळी आदित्य ठाकरेंकडे मुख्यमंत्रिपदाचा चार्ज देण्याचा देखील सल्ला भाजपाकडून देण्यात आला आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.
“नेत्याला सहानुभूती चालत नाही”
“बाळासाहेब ठाकरेंबद्दल आमच्या मनात आदर आहे. या संस्कृतीला आपली मानणारा माणूस कुणाचं अहित चिंतणारच नाही. पण त्यामुळे तुम्ही राज्यावर अन्याय करू नका. एक फार मोठे नेते आजारी होते, तेव्हा दुसऱ्या नेत्याने त्यांना भेटून चौकशी केली, तेव्हा त्यांनी म्हटलं की सहानुभूती ही सामान्य माणसाला ठीक आहे, ती नेत्याला नाही चालत. त्यामुळेच तो नेता होतो”, अशी आठवण चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितली.
४५ दिवस मुख्यमंत्री दिसले नाहीत!
दरम्यान, उपचार काळात राज्यानं मुख्यमंत्र्यांना पाहिलं नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. “४५ दिवस राज्याच्या जनतेने राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पाहिलेलं नाही. आमचं म्हणणं आहे की तुम्ही बरे व्हा ना. तुमची प्रकृती ठीक नसेल तर चार्ज द्या. एक दिवस विदेशात जायचं असेल, तर चार्ज द्यावा लागतो. पण तुमचा कुणावर भरवसाच नाहीये. चला चार्ज तुम्ही ज्याच्यावर विश्वास आहे अशा आदित्य ठाकरेंकडे द्या. कुणीतरी माणूस हवा ना”, असं पाटील म्हणाले.
“…अशी अवस्था सरकारने केलीये”, फडणवीसांनी इंदिरा गांधींच्या काळातल्या घोषणेची करून दिली आठवण!
“बाबासाहेब पुरंदरे गेल्यानंतर त्यांना शासकीय मानवंदना देण्याची फाईल ५ तास पडून होती. कुणी सही करायची? बाबासाहेब पुरंदरेंसारख्या व्यक्तीच्या अंत्यसंस्काराच्या फाईलवर ५ तास सही होत नाही, ही मोठी घटना आहे”, असं ते म्हणाले.
फडणवीसांनीही साधला निशाणा
यासंदर्भात विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील दुपारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर दिलं होतं. “उद्धव ठाकरेंना माझ्या पूर्ण शुभेच्छा आहेत. त्यांना उत्तम आरोग्य लाभावं ही आमच्या सगळ्यांची इच्छा आहे. ते आज येत असतील तर त्याचा आम्हाला आनंदच आहे. पण ते आले किंवा नाही, पण या दोन वर्षांत सरकारचं अस्तित्वच दिसलं नाही”, असं म्हणत फडणवीसांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला होता.