भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे विरोधक म्हणून महाविकासआघाडी सरकारवर कायम टीका टिप्पणी करत असतात. महाविकास आघाडीच्या नेत्यांना देखील त्यांच्याकडून लक्ष्य केलं जातं. आता चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधल्याचं दिसत आहे.

“शरद पवार पंतप्रधान होणार असे नेहमीच म्हटले जाते, कधी होतील हे मात्र माहीत नाही.” असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी निशाणा पवारांवर साधला आहे. तर, “देशाच्या राजकारणात जाण्यासाठी इच्छा असून चालत नाही, फिरावं लागतं.” असा टोला देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लगावल्याचं दिसत आहे.

“काशीला जाण्याची इच्छा असणारी माणसं सतत मला काशीला जायचंय असं म्हणत राहतात, तेंव्हा कधीतरी काशीला जाता येतं. शरद पवार यांच्याबाबत देखील ते पंतप्रधान होणार असे सारखे म्हटले जाते, पण त्यांचं मला काही माहिती नाही.” असं चंद्रकांत पाटील शरद पवारांबद्दल म्हणाले आहेत.

तसेच, “उद्धव ठाकरे आता देशाच्या राजकारणात जाणार आहेत असं म्हणतात, पण त्यासाठी फिरावं लागतं. उद्धव ठाकरे दोन वर्षात एकदाही मंत्रालयात गेले नाहीत. वर्षातून केवळ तीनदाच मंत्रालयात जाण्याचा तेलंगणा राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा रेकॉर्ड उद्धव ठाकरे यांनी मोडून दाखवला.” असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना चंद्रकांत पाटील यांनी टोला लगावल्याचं दिसत आहे.

Story img Loader