- ९३ शाखांमध्ये ७ लाखांवर खातेधारक
- पूर्व विदर्भातील बँकांमध्ये ग्राहकांचा गोंधळ
नोटाबंदीमुळे ग्रामीण भागातील खातेदारांची झालेली गैरसोय टाळण्यासाठी सहकारी बँकांना २१ हजार कोटी देण्याचे पंतप्रधानांनी मान्य केले खरे, पण चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शिखर बँकेकडे १० कोटींची मागणी केल्यावर फक्त २५ लाखांवर या बँकेची बोळवण करण्यात आली असून आता ९३ शाखांमधील ७ लाख ३६ हजार ८४ खातेधारकांना हा पैसा कसा वाटायचा, असा प्रश्न बँक व्यवस्थापनाला पडला आहे. विशेष म्हणजे, रिझव्र्ह बँकेने नागपूरच्या शिखर बँकेला अवघे १ कोटी रुपये दिले असून पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली व चंद्रपूर बँकांमध्ये ग्राहकांनी आताशा गोंधळ घालणे सुरू केले आहे.
नोटाबंदीनंतर जिल्हा सहकारी बँकेला जुन्या नोटा घेणे, बदलून देणे, तसेच खात्यात जमा करणे, या संपूर्ण प्रक्रियेवर केंद्र सरकार व रिझव्र्ह बँकेने बंदी घातली आहे. परिणामी चंद्रपूर व गडचिरोली जिल्हा बँकेत ८० कोटी रुपये बिनव्याजी पडून आहेत. कारण, हा पैसा रिझव्र्ह बँक आणि भारतीय स्टेट बँक घेण्यास तयार नाही, त्यामुळे एकीकडे जिल्हा बँक व्यवस्थापनाची धावपळ होत असून दुसरीकडे पैसे मिळत नसल्याने ग्राहकांनी ओरड सुरू केली आहे. चंद्रपूर जिल्हा बँकेत एकूण ७ लाख ३६ हजार ८४ खातेधारक आहेत. यात शेतकऱ्यांची ३१ हजार ११४ स्वतंत्र कर्ज खाती व किसान क्रेडिट कार्डधारक शेतकऱ्यांची संख्या ७७ हजार ५९७ आहे. मात्र, या बँकेलाचंद्रपूर जिल्हा बँकेत एकूण ७ लाख ३६ हजार ८४ खातेधारक आहेत रिझव्र्ह बँक, भारतीय स्टेट बँक व शिखर बँकेने नवीन नोटाच देणे बंद केल्याने ग्रामीण भागातील या बँकांचे कंबरडेच मोडले आहे. चंद्रपूर जिल्हा बँकेच्या जिल्हाभरात एकूण ८२ शाखा व ११ पे ऑफिसेस आहेत. या शाखांमध्ये ग्राहक रोज येत असून पैसे न मिळल्याने संतप्त होऊन परतत आहेत. अनेकांची तर बँक व्यवस्थापनाशी भांडणेही झालेली आहेत. आम्हाला आमचे पैसे परत द्या, अशी मागणी त्यांनी सुरू केली आहे.
दरम्यान, चंद्रपूर जिल्हा बँकेने रिझव्र्ह बँक व शिखर बँक व्यवस्थापनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू केला. सहकारी बँकांना २१ हजार कोटी देण्याचे पंतप्रधानांनी मान्य केल्यावर गुरुवारी रिझव्र्ह बँकेने नागपुरातील शिखर बँकेला अवघे १ कोटी रुपये दिले. यातून त्यांनी ९३ शाखांसाठी फक्त २५ लाख रुपये चंद्रपूर जिल्हा बँके ला दिले. त्यामुळे ७ लाख ग्राहकांमध्ये ही रक्कम वितरित कशी करायची, असा प्रश्न बँक व्यवस्थापनाला पडला आहे.
शिखर बँक पूर्व विदर्भातील मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये हा पैसा कसा वितरित करणार, हाही प्रश्नच आहे. गडचिरोली, भंडारा, गोंदिया, वर्धा येथील बँकांचीही अशीच अवस्था आहे.
दाद मागायची तरी कुणाकडे?
चंद्रपूर व गडचिरोली जिल्हा बँकेकडे १५ लोकांच्या लग्नपत्रिका आलेल्या आहेत. त्यांना अडीच लाख रुपये हवे आहेत. मात्र, बँकेतून पैसे मिळत नसल्याने त्यांना धावपळ करावी लागत आहे. आमचेच पैसे आम्हाला मिळत नसल्याने आम्ही आता दाद तरी कुणाकडे मागायची, असा प्रश्न या कुटुंबांना पडला आहे.