आपल्या मनातील बंधू प्रेमाचा हळवा कोपरा जपतानाच आपल्या जिल्ह्यातील बांबू वरील आधारित उद्योग व्यवसायाला चालना देण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील आमदार प्रतिभा धानोरकर यांनी रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर एका महिला उद्योजकाचा हुरूप वाढवल्याचे दिसून आले.
चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा भद्रावती येथील आमदार प्रतिभा धानोरकर यांनी आपले बंधुप्रेम जपतानाच मतदार संघातील महिला भगिनींच्या उद्योग व्यवसायाला वृद्धी देण्यासाठी थेट त्यांच्या घरी जाऊन कौतुक केल्याची घटना लक्षवेधी ठरली आहे.
भाऊ-बहिणीच्या स्नेहाचा धागा घट्ट करणारा रक्षाबंधनाचा सण काही दिवसांवर आला आहे. राखीच्या या धाग्याला पर्यावरणपूरकतेची किनार दयायची आणि स्थानिक कलावंताना प्रोत्साहन देण्याचे कार्य आमदार प्रतिभा धानोरकर यांनी केले आहे. चंद्रपूर येथील मीनाक्षी मुकेश वाळके यांनी बनवलेल्या बांबूच्या राख्या सध्या आकर्षणाचे केंद्र बनल्या आहेत. या राख्यांच्या प्रेमात आमदार प्रतिभाताई धानोरकर ह्या देखील पडल्या आहेत.
चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याची ओळख वनांचा जिल्हा अशी आहे. यापासून हस्तकलेच्या माध्यमातून राख्या तयार करण्याची कल्पना मीनाक्षी वाळके यांना सुचली. त्यांनी बांबू पासून राख्या तयार केल्या. त्यांच्या राख्यांना दिल्ली, झारखंड, जबलपूर, ठाणे, पुणे, मुंबई, गुडगाव येथून मागणी आली. यामध्ये आतापर्यंत तब्बल पाच ते सहा हजार राख्यांची विक्री करण्यात आली आहे. या राख्यांची वाढती मागणी लक्षात घेऊन या हस्तकला उद्योगाला चालना देण्याकरता आपण सदैव तत्पर असल्याची भावना आमदार प्रतिभा धानोरकर यांनी व्यक्त केली. चंद्रपूर जिल्ह्यातील बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र या ठिकाणी प्रशिक्षित झालेल्या शेकडो महिला सध्या बांबू पासून वेगवेगळ्या कास्ट शिल्पाची निर्मिती करतात, यातून मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे.
आणखी वाचा- चंद्रपूर : महिला स्वयंसहायता समूहाच्या मदतीने ५ हजार ३०० परसबागा विकसित
आमदार प्रतिभा धानोरकर यांनी नुकतेच बांबूपासून राख्या बनविण्याचा व्यवसाय करणाऱ्या मीनाक्षी वाळके यांचे घर गाठले. त्यांच्याकडील विक्रीला असलेल्या बांबूच्या राख्यांची त्यांनाही भुरळ पडली. त्यांनी ह्या राख्या खरेदी करून इतरही महिलांना पर्यावरणपूरक राख्या खरेदी करून हस्तकला उद्योगाला प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले.
या महिलांनी आपल्या कला-कौशल्यातून पर्यावरणपूरक राख्या तयार केल्या आहेत. या राख्या तयार करण्यासाठी बांबू, नैसर्गिक रंग, विविध रंगाचे रेशम धागे, लाकडी मनी या साहित्याचा वापर करण्यात आला आहे. यामुळे राख्या अधिक आकर्षक असल्याने याची मागणी हळूहळू वाढू लागली आहे.
या भागातील महिलांना चांगल्या प्रकारे रोजगार मिळावा व त्यांच्या कलेला प्रेरणा मिळावी यासाठी सर्वानी ह्या राख्या खरेदी कराव्यात, त्यासोबतच कंदील, शोभेच्या वस्तू व इतर येणाऱ्या सणानुसार पर्यावरणपूरक वस्तू तयार करण्यात येत असतात. यातून या महिलांना चांगला रोजगार मिळू लागला आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये सुद्धा नवचैतन्याचे वातावरण पसरले आहे. रोजगाराच्या मोठा प्रश्न या उद्योगातून सुटला जाऊ शकतो. त्यामुळे या व्यवसायाला बाजारपेठ उपलब्ध करण्यासाठी येत्या काळात प्रयत्न करणार असल्याची ग्वाही आमदार प्रतिभा धानोरकर यांनी दिली.