राज्यातील सर्वाधिक प्रदूषित अशा आठ शहरांमध्ये चंद्रपूर पहिल्या तर डोंबिवली व औरंगाबाद अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर असल्याचे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पाहणीतून स्पष्ट झाले आहे. मंडळाच्या धोकादायक प्रदूषणाच्या वर्गवारीत राज्यातील नवी मुंबई व तारापूरचासुद्धा समावेश आहे.
 केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने सर्वाधिक उद्योग असलेल्या देशभरातील ८८ ठिकाणांची पाहणी केली. या पाहणीसाठी काही शास्त्रीय निकष निश्चित करण्यात आले होते. यात राज्यातील आठ शहरांचा समावेश होता. हवा, पाणी व जमीन तसेच भूगर्भातील प्रदूषण याद्वारे तपासण्यात आले. यात चंद्रपूर राज्यात पहिल्या क्रमांकाचे प्रदूषित शहर असल्याचे स्पष्ट झाले आहे.
देशातील प्रदूषित शहरांमध्ये चंद्रपूरचा क्रमांक तिसरा आहे. राज्यात दुसऱ्या क्रमांकाचे प्रदूषित शहर डोंबिवली असून देशात त्याचा क्रमांक १४ वा आहे. देशात १७ व्या क्रमांकावर असलेले औरंगाबाद राज्यात तिसऱ्या क्रमांकावर आहे. नवी मुंबई व तारापूर अनुक्रमे ४ व ५ व्या क्रमांकावर आहे. त्यानंतर नाशिक, चेंबूर व पिंपरी चिंचवडचा क्रमांक आहे. या पाहणीत ७० पेक्षा जास्त अंक मिळवणाऱ्या शहरांना प्रदूषण नियंत्रण मंडळाने धोकादायक प्रदूषण या वर्गवारीत ठेवले आहे. या वर्गवारीत राज्यातील पाच शहरांचा समावेश आहे.
चंद्रपूरला ८३, डोंबिवलीला ७८, औरंगाबादला ७७, नवी मुंबईला ७३ तर तारापूरला ७२ अंक मिळाले आहेत. हवा, पाणी व जमीन या तिनही प्रकारात चंद्रपूरला राज्यात सर्वाधिक अंक देण्यात आले असून यामुळेच या शहरात मध्यंतरी नवीन उद्योगांवर बंदी घालण्यात आली होती. नंतर ही बंदी हळूच उठवण्यात आली. गेल्या महिन्यात नागपुरात झालेल्या ‘अ‍ॅडव्हाँटेज विदर्भ’ औद्योगिक गुंतवणूक परिषदेत चंद्रपूरमध्ये नवीन उद्योग सुरू करण्यासाठी अनेकांनी अनुकूलता दाखवली. यानंतर तसे करारसुद्धा करण्यात आले. त्यामुळे या शहराच्या प्रदूषणात आणखी वाढ होण्याची भीती प्रदूषण नियंत्रण मंडळातील अधिकाऱ्यांनी आता व्यक्त केली आहे. राज्यातील सर्वाधिक प्रदूषित असलेल्या आठ शहरांमध्ये विदर्भ व मराठवाडय़ातील प्रत्येकी एक शहर असून उर्वरित सहा शहरे पुणे, मुंबई, नाशिक या पट्टय़ातील आहेत. यामुळे औद्योगिक विकास केवळ काही शहरांपुरताच मर्यादित असल्याचे या पाहणीतून स्पष्ट झाले आहे. प्रदूषण नियंत्रणासाठीच्या उपाययोजनांचा कोणताही फरक या शहरांवर पडला नसल्याचे या पाहणीतून स्पष्ट झाले आहे.