*  २००२ मध्ये ४९ अंशांच्या तापमानाची नोंद
*  अल्वरची ५०.६ अंशांसह देशात आघाडी
चंद्रपूरला गेल्या रविवारी-सोमवारी ४७.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याचे ऐकून अनेकांचे डोळे पांढरे झाले असतील, पण महाराष्ट्रातील उष्म्याचा इतिहासात हा आकडा सामान्यच ठरतो. कारण चंद्रपूर याच ठिकाणी २००२ साली राज्यातील आतापर्यंतच्या सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे, हा आकडा होता तब्बल ४९ अंशांचा! त्या तुलनेत गेल्या सोमवारची चंद्रपूरच्या उकाडय़ाची नोंद ही आतापर्यंतची पंधरावी ठरली आहे. देशाचा विचार केला तर हा मान राजस्थानमधील अल्वरला जातो. तिथे १९५६ सालच्या मे महिन्यात ५०.६ अंशांची नोंद झाली होती.
चंद्रपूर व एकूणच विदर्भात सध्या पसरलेल्या उष्णतेच्या लाटेच्या पाश्र्वभूमीवर महाराष्ट्र व देशातील आतापर्यंतच्या उकाडय़ाची माहिती घेतली असता अनेक गोष्टींचा उलगडा झाला. भारतीय हवामानशास्त्र विभागाकडे उपलब्ध असलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात आतापर्यंत नोंदवल्या गेलेल्या सर्वोच्च तापमानात चंद्रपूरनेच आघाडी घेतली आहे.
 सर्वाधिक तापमानाचे पहिले दोन आकडे याच शहराच्या नावावर आहेत. २ जून २००२ रोजी तिथे ४९.० अंशांची नोद झाली. त्यानंतर २ मे २००४ रोजी ४८.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. त्यानंतर पहिल्या पाचांमध्ये खान्देशातील जळगाव (४८.४ अंश), विदर्भातील वर्धा (४८.४) व अमरावती (४८.३) यांचा क्रमांक लागतो.
विदर्भच आघाडीवर
महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमानाच्या आतापर्यंतच्या पहिल्या पंधरा नोंदींपैकी सहा नोंदी एकटय़ा चंद्रपूरच्याच आहेत. हा इतिहास पाहिला तर चंद्रपूरची या आठवडय़ातील ४७.९ अंश ही नोंद सर्वात तळाची म्हणजे पंधरावी ठरते. राज्यातील उकाडय़ामध्ये विदर्भच आघाडीवर आहे.
चंद्रपूरशिवाय वर्धा, अमरावती, ब्रह्मपुरी, सिरोंचा (गडचिरोली) या ठिकाणीही पारा ४८ अंशांच्या पुढे गेल्याचे इतिहास सांगतो. नागपूर येथील आतापर्यंतची सर्वाधिक नोंद ४७.७ अंशांची आहे. राज्यातील सर्वोच्च पहिल्या वीस तापमानांमध्येही विदर्भानेच आघाडी घेतली आहे. विदर्भ वगळता तिथे केवळ जळगाव व अहमदनगर या शहरांनी तापमानाच्या या यादीत स्थान मिळवले आहे. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव येथे २८ मे १९८९ रोजी तब्बल ४८.४ अंशांची नोंद झाली होती, तर पश्चिम महाराष्ट्रातील अहमदनगर येथे १० एप्रिल २००० रोजी पारा ४८.२ अंशांपर्यंत चढला होता.
देशात चार वेळा पाऱ्याची ‘पन्नाशी’
सर्वोच्च तापमानाच्या बाबतीत देशात राजस्थान आघाडीवर आहे. देशातील सर्वाधिक तापमानाच्या पहिल्या दहापैकी सात नोंदी राजस्थानमधील आहेत. उरलेल्या दोन नोंदी आहेत त्या ओरिसामधील तितलागड, तर एक नोंद आहे उत्तर प्रदेशातील गोंडा या ठिकाणची. अल्वर (५०.६ अंश), तितलागड (५०.१), धोलपूर (५०), गंगानगर (५०) या चार ठिकाणी तापमानाने ५० अंशांचा आकडा गाठला आहे. त्यानंतर पहिल्या दहामध्ये बाडमेर, गोंडा, दामोह, सिकर, टोंक या ठिकाणांचा क्रमांक लागतो.

राज्यातील अव्वल दहा ठिकाणे
(ठिकाण, तापमान व नोंदवल्याचा दिनांक या क्रमाने)
चंद्रपूर        ४९.०        (२ जून २००२)
चंद्रपूर        ४८.६        (२ मे २००४)
जळगाव        ४८.४        (२८ मे १९८९)
वर्धा        ४८.४        (१७ मे १९८९)
अमरावती               ४८.३        (६ मे १९८८)
ब्रम्हपुरी        ४८.३        (८ मे २००३)
ब्रह्मपुरी        ४८.३        (२६ मे २०१०)
चंद्रपूर        ४८.३        (१६ मे १९१२)
अहमदनगर    ४८.२        (१० एप्रिल २०००)
सिरोंचा        ४८.२        (१० मे १९७३)