नक्षलवाद व दहशतवादी हल्ल्याचा संभाव्य धोका लक्षात घेऊन येथील महाऔष्णिक विद्युत केंद्राची सुरक्षा केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडे (सीआयएसएफ) सोपविण्याचा महत्वपूर्ण निर्णय ऊर्जा खात्याने घेतला आहे. मार्चच्या अखेरीस ४०० सुरक्षा जवानांची तुकडी येथे दाखल होणार आहे. अशी सुरक्षा घेणारे हे राज्यातले पहिलेच वीज निर्मिती केंद्र आहे.
शेजारच्या गडचिरोली जिल्ह्य़ातील नक्षलवादी चळवळ आता शहरी भागातही वेगाने हातपाय पसरू लागली आहे. या जिल्ह्य़ात नक्षलवादी पुन्हा सक्रिय होत असल्याचा इशारा गुप्तचर यंत्रणांनी वारंवार दिला आहे. भविष्यात नक्षलवादी मोठय़ा आस्थापनांना लक्ष्य करू शकतात, हे लक्षात घेऊन येथील वीज निर्मिती केंद्राची सुरक्षा व्यवस्था केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडे देण्याचा निर्णय ऊर्जा खात्याने घेतला आहे. सध्या या केंद्राची सुरक्षा वीज कंपनीच्या सुरक्षा विभागाकडून पाहिली जाते. या सुरक्षा विभागातील कर्मचारी त्याकडे लक्ष देत नसल्याने येथील केंद्रात चोरीचे प्रमाणही दुपटीने वाढले आहे. गेल्या काही दिवसांत तर या परिसरात भंगार चोरटय़ांनी अक्षरश: धुमाकूळ घातला असून, जवळपास तीन ते साडेतीन कोटीची सामग्री चोरून नेली आहे.
सध्या महाऔष्णिक वीज केंद्र परिसरात एक हजार मेगाव्ॉटच्या नवीन प्रकल्पाचे काम सुरू आहे. तेथे मोठय़ा प्रमाणात साहित्य पडून राहत असल्याने तेथील वस्तूंचीही चोरी होत आहे, तर युनिट क्रमांक एक व दोनमध्ये अधिकाऱ्यांच्या संगनमतानेच चोरी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. महागडय़ा केबलपासून कोळसा, लोखंडी वस्तू, सुटे भाग व इतर साहित्याची चोरी होत आहे. तुकूम, ऊर्जानगर, दुर्गापूर, पद्मापूर परिसरातील चोरटय़ांच्या टोळय़ांचा यात सक्रिय सहभाग आहे. वीज केंद्राला चारही बाजूंनी सुरक्षा भिंत असली तरी त्याला भगदाड पाडून चोरटे आत शिरतात. यात स्थानिक खासगी व वीज केंद्राची सुरक्षा यंत्रणाही सहभागी असल्याचे निदर्शनास आले आहे. सुरक्षा व्यवस्थेसाठी महाऔष्णिक वीज केंद्राने ३.७५ कोटीचा निधी सीआयएसएफकडे नुकताच जमा केला आहे. मार्चअखेरीस येथे दाखल होणाऱ्या ४०० जवानांमध्ये २०० जवान तरुण आहेत, तर २०० जवान मध्यमवयीन असल्याची माहिती अभियंता मसराम यांनी लोकसत्ताशी बोलतांना दिली. या जवानांसाठी महाऔष्णिक वीज केंद्र परिसरातच स्वतंत्र वसाहत तयार करण्यात येत आहे. या दलाचे प्रमुख कमांडर नुकतेच वीज केंद्रात येऊन गेले. वीज केंद्रात आठ ते दहा ठिकाणी सीसीटीव्ही, तर दहा ठिकाणी फिरते लाईट्स लावण्यात येणार आहेत.  तीन पाळ्यांत चोवीस तास सुरक्षा राहणार आहे. वीज केंद्रात येणाऱ्या प्रत्येकाची तपासणी करण्यासोबतच बाहेर पडतांनाही तपासणी करण्यात येणार आहे. वीज केंद्र परिसरात एखाद्याला चोरी करतांना पकडले तर कारवाईचे पूर्ण अधिकार या सुरक्षा दलाकडे राहणार आहेत.

महिलांची टोळी सक्रीय
महाऔष्णिक वीज केंद्रात महिला चोरटय़ांची स्वतंत्र टोळी सक्रिय असल्याची माहिती सूत्रांनी दिली. नजीकच्या परिसरात असलेल्या या महिला पहाटे सुरक्षा भिंत पार करून वीज केंद्रात प्रवेश करतात. तेथे महागडय़ा साहित्याची, कोळशाची चोरी करून निघून जातात. एखाद वेळेस या महिलांना सुरक्षा अधिकाऱ्यांनी पकडले, तर आरडाओरड करून बलात्काराची तक्रार करण्याची धमकी देतात, अशी माहिती सूत्रांनी दिली. शहरातील बडय़ा भंगार विक्रेत्यांनीच ही टोळी सक्रिय केली असल्याची माहिती समोर आली आहे.

Story img Loader