अप्पर वर्धा धरणाचे पाणी सोडल्यानंतर वर्धा नदीला पूर आला आहे. भद्रावती व वरोरा तालुक्यातील अनेक गावे पुराखाली आहेत. माजरी येथील पोलीस ठाण्यात पाणी शिरले असून पोलीस कर्मचारी ठाण्यातील कागदपत्रे व साहित्य सुरक्षित बाहेर काढण्याचा प्रयत्न करीत आहेत.
वर्धा नदीच्या वरच्या भागातील धरणांमधून प्रचंड विसर्ग –
चंद्रपूर जिल्ह्यात ४८ तासांत पासून नसला तरी वर्धा नदीच्या वरच्या भागातील धरणांमधून प्रचंड विसर्ग होत असल्याने अनेक ठिकाणी पूरस्थिती आहे. माजरी येथील अख्खे पोलीस ठाणे पुरात बुडाल्यानंतर प्रशासनाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाठविले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.
खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभा धानोरकर, माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांनी बुधवारी या भागाला भेट देऊन परिस्थितीची माहिती घेतली.
फर्निचर तथा इलेक्ट्रिक साहित्य पाण्यामुळे खराब –
माजरी पोलीस ठाण्यातील फर्निचर तथा इलेक्ट्रिक साहित्य पुरामुळे खराब झाले आहे. २४ तासापेक्षा अधिक काळ पोलीस ठाणे पाण्यात आहे. तसेच या भागातील असंख्य घरे व इतर शासकीय इमारती पाण्याखाली आहेत. चंद्रपूर, वरोरा व भद्रावती तालुक्यात लष्कराचे १ पथक, ‘एनडीआरएफ’चे १ पथक, ‘एसडीआरएफ’च्या दोन टीम व स्थानिक टीमच्या सहाय्याने वर्धा नदी पात्रालगतच्या गावातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात येत आहे.