तामिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी केंद्रात २८ पक्षांचे सरकार आल्यास हिंदु संस्कृती, देव, धर्म संपवून टाकू, असे केलेले वक्तव्य पृथ्वीराज चव्हाणांना मान्य आहे का? असा सवाल करून, त्यांना हे मान्य नसल्यास त्यांनी इंडिया आघाडीतून बाहेर पडावे आणि मान्य असेलतर कराडची जनता त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नसल्याचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
कराडमध्ये ‘घर चलो’ अभियानांतर्गत जाहीर सभेत ते बोलत होते. भाजपाचे महामंत्री विक्रांत पाटील, सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले, आमदार जयकुमार गोरे, जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, मनोज घोरपडे, रामकृष्ण वेताळ, शहराध्यक्ष एकनाथ बागडी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
बावनकुळे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील प्रभावी व्यक्तिमत्व असून, त्यांच्या नेतृत्वाला दीडशे देशांनी, जगभरातील ७८ टक्के लोकांनी पसंती दिली. आजच्या ‘घर चलो’ अभियानात लोकांनी पंतप्रधान म्हणून मोदींना प्रचंड समर्थन दर्शवले. अन्यत्रही असाच भरघोस पाठींबा मिळत असल्याने नरेंद्र मोदी २०२४ मध्ये पंतप्रधानपदाची शपथ घेताना त्यांना सर्वाधिक मतांनी विजयी झालेला सातारचा भाजपा खासदार समर्थन देईल. तसेच नोव्हेंबर २०२४ मध्ये विधानसभेत कराड दक्षिणचे आमदार म्हणून डॉ. अतुल भोसले उपस्थित असतील. यावेळी विक्रमी मतांनी ते निवडून येतील. विरोधकांची अनामत रक्कमही जप्त करतील, असा विश्वास बावनकुळे यांनी दिला.
मोदींच्या नेतृत्वाखाली कश्मीरमधील ३७० कलम हटल्याने कश्मीरात तिरंगा फडकला. ३७० कलम हटवल्यास कश्मीरमध्ये रक्ताचे नद्या वाहतील, असे काहींनी म्हटले. पण, एक दगडही कोणी मारला नाही. हीच मोदींची ताकद आहे. येत्या २२ जानेवारीला प्रभू रामचंद्रांचा इतिहास देशासमोर येईल. त्याचे साक्षीदार होण्यासाठी सर्वांनी अयोध्येत यावे, असे आवाहन बावनकुळे यांनी केले.
उद्धव ठाकरेंनी आमच्या पाठीत खंजीर खूपसला. पण, या बेइमानीचा लोकांनी बदला घेतल्याने त्यांच्याकडे धनुष्यबाणही राहिला नाही. शरद पवारांकडे त्यांची घडी राहणार नसल्याचा दावा बावनकुळे यांनी केला. डॉ. अतुल भोसले यांनी सातारा लोकसभेसाठी भाजपा उमेदवार भरघोस मतांनी निवडून आणू. जिल्ह्यातील विधानसभेच्या सर्व जागाही जिंकू असा विश्वास दिला.