भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत केलेल्या विधानामुळे राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापताना दिसत आहे. “शरद पवारांनी अडीच वर्षांपूर्वी उद्धव ठाकरे यांच्यावर जादूटोणा केला होता. त्यात उद्धव ठाकरे फसले आणि विचार न करता राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर गेले.” असं बावनकुळेंनी म्हटलं आहे. या विधानानंतर आता विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही यावर प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.
हेही वाचा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘या’ मागणीसाठी आमदार रोहित पवारांनी पाठवलं पत्र, म्हणाले…
“भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या मेंदूची आधी तपासणी करुन घ्यावी आणि मग बोलावे.” अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी टीका केली आहे. तसेच, “जादूटोणा, भोंदूबाबा हे शब्द सभ्य संस्कृतीतील नाहीत. राजकारण करायचं असेल तर मुद्दयावर राजकारण करा.” असा इशाराही महेश तपासे यांनी बावनकुळे यांना दिला आहे.
याशिवाय “महाराष्ट्रात जादूटोणा विरोधी कायदा कुठल्या सरकारने आणला याचा विसर बावनकुळे यांना पडला असावा.”, असा टोला लगावतानाच “शरद पवार यांची पकड महाराष्ट्रावर आहे. तुमच्यासारख्या जातीयवादी पक्षाच्या तावडीतून शिवसेनेला मुक्त करुन महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केले ही किमया पवारांची आहे. त्यामुळे २९ नोव्हेंबरला सुप्रीम कोर्टाचा निकाल येईल, तेव्हा तुमचे सरकार पायउतार होणार हे निश्चित आहे. त्यानंतर तुम्हाला जादूटोणा जे काही करायचं ते करा.” असेही महेश तपासे यांनी बावनकुळे यांना सुनावले आहे.