सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार बेकायदेशीर आहे, हे स्पष्ट झालं असून आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी नैतिकतेच्या आधारे राजीनामा दिला पाहिजे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी काल माध्यामांशी बोलाताना केली होती. उद्धव ठाकरेंच्या या टीकेला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. सोलापुरात माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.
काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे?
“बाळासाहेब ठाकरे हे लढणारे नेते होते, तर उद्धव ठाकरे हे रडणारे नेते आहेत. ते आता रडोबा झाले आहेत. खरं तर उद्धव ठाकरे स्वत: रणांगणातून पळून गेले होते. ज्या दिवशी आमदार-खासदार त्यांना सोडून गेले, ते त्याच दिवशी त्यांचा पराभव झाला होता. त्यामुळे नैतिकता वगैरे असे शब्द उद्धव ठाकरेंच्या तोंडी योग्य वाटत नाही”, असं प्रत्युत्तर चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं
“उद्धव ठाकरेंनी नैतिकता २०१९ मध्येच सोडली होती. त्यावेळी पंतप्रधान मोदी आणि अमित शाहा यांच्या सभेत देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री असतील, हे त्यांनी मान्य केलं होतं. मात्र, निवडणुकीनंतर त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीची विचारधारा जवळ केली. त्यामुळे सर्वात आधी नैतिकता ही त्यांनी सोडली”, असेही ते म्हणाले.
हेही वाचा – सुप्रीम कोर्टाच्या निकालावर ठाकरे गटाचा प्लॅन ऑफ अॅक्शन तयार; म्हणाले, “१५ दिवसांत…!”
उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले होते?
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी शिंदे गट भाजपावर जोरदार टीका केली होती. न्यायालयाच्या निर्णयांतर राज्यातील सरकार बेकायदेशीर हे स्पष्ट झालं आहे, असं ते म्हणाले होते. तसेच “मी नैतिकतेच्या आधारे राजीनामा दिला होता. माझ्यावर माझ्या घराण्याचे संस्कार किंवा शिकवण महत्वाची आहे. म्हणूनच मी राजीनामा दिला. आता माझ्याप्रमाणे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे,” अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली होती.