भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांची मुंबईत सभा होणार नसल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. इतकंच नाही तर पोलीस त्यांनी पुण्यालाही जाऊ देणार नाही आहेत. नियोजित कार्यक्रमाप्रमाणे चंद्रशेखर आझाद यांची आज २९ डिसेंबर रोजी वरळीच्या जांबोरी मैदानात संध्याकाळी ४ वाजता सभा होणार होती. वरळी पोलिसांनी त्यांना परवानगी नाकारली होती. मात्र तरीही सभा होणारच असा निर्धार भीम आर्मीने केला होता. चंद्रशेखर आझाद मालाडच्या हॉटेल मनालीमध्ये थांबले होते. नंतर पोलिसांनी त्यांना अज्ञातस्थळी नेलं होतं.
आझाद पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले आहेत. त्यानिमित्त त्यांच्या राज्यात विविध ठिकाणी पाच सभा नियोजित आहेत. त्यातील पहिली सभा २९ डिसेंबर रोजी वरळीच्या जांबोरी मैदानात संध्याकाळी ४ वाजता होणार होती. त्यानंतर ३० डिसेंबरला पुण्यात सभा, ३१ डिसेंबरला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात व्याख्यान, १ जानेवारीला भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी, २ जानेवारीला लातूर येथे सभा त्यानंतर ४ जानेवारीला अमरावती येथे जाहीर सभा असा नियोजित कार्यक्रम आहे.
चंद्रशेखर आझाद मालाडच्या हॉटेल मनालीमध्ये थांबले होते. शुक्रवारी त्यांनी आपल्याला मुंबई पोलिसांनी नजरकैदेत ठेवल्याचा गंभीर आरोप केला होता. कुठल्या कायद्यानुसार आपल्याला कैदेत ठेवण्यात आले, असा सवाल त्यांनी केला. वरळीतील सभेत राज्यभरातून भीम आर्मीचे कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. पण पोलिसांनी परवानगी नाकारल्याने संतप्त झालेल्या आझाद यांनी ही सभा होणारच असं गुरुवारी पत्रकार परिषदेत जाहीर केलं.
शुक्रवारी ठरल्याप्रमाणे संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास चैत्यभूमीवर अभिवादन करण्यासाठी चंद्रशेखर आझाद निघाले होते. त्यावेळी पोलिसांनी त्यांना अज्ञात गाडीतून अज्ञातस्थळी नेल्याची माहिती भीम आर्मीचे प्रवक्ता महमूद पवार यांनी दिली. सभेला पालिकेने परवानगी दिली असूनही सभा न होण्यासाठी भाजपा सरकार दबाव आणत आहे असा आरोप त्यांनी केला.