भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. यामध्ये ते भाजपा कार्यकर्त्यांना पत्रकारांना चहा प्यायला नेण्याचा, त्यांना ढाब्यावर जेवायला घेऊन जाण्याचा सल्ला देत आहेत. जेणेकरून पत्रकारांनी २०२४ च्या निवडणुकीपर्यंत भाजपाविरोधात बातम्या छापू नयेत. भारतीय जनता पार्टीच्या वतीने रविवारी (२४ ऑगस्ट) अहमदनगरच्या सावेडी येथे पदाधिकारी आणि बूथ कार्यकर्त्यांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. बावनकुळे यांनी यावेळी पदाधिकाऱ्यांना आगामी निवडणुकीच्या मोर्चेबांधणीसंदर्भात मार्गदर्शन केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या बैठकीवेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या भाषणाच्या काही भागाची ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. यामध्ये चंद्रशेखर बावनकुळे पदाधिकाऱ्यांना सल्ला देत आहेत की “पत्रकारांनी २०२४ पर्यंत आपल्याविरोधात (भाजपा) बातम्या छापू नये, यासाठी त्यांना चहा प्यायला न्या. पत्रकारांना चहा प्यायला न्यायचं म्हणजे काय ते तुम्हाला समजलंच असेल. तसेच पत्रकारांना ढाब्यावर जेवायला घेऊन जा.”

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, तुम्ही ज्या बूथवर काम करताय. त्या बूथवर इलेक्ट्रॉनिक मीडियावाला कोण आहे? त्याची माहिती घ्या. आपण इतकं चांगलं काम करतो, ते लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. आपल्या बूथवर जे चार-पाच कलाकार पत्रकार आहेत, त्यांची यादी बनवा. या पत्रकारांना महिन्यातून एकदा चहा प्यायला बोलवा. त्यांनी २०२४ पर्यंत आपल्याविरोधात लिहू नये यासाठी त्यांना चहा प्यायला बोलवा. चहा प्यायला बोलावणे म्हणजे काय ते तुम्हाला माहिती आहे. त्यांना ढाब्यावर वगैरे घेऊन जायचं. त्यांना व्यवस्थित सांभाळून ठेवायचं. आपल्याविरोधात एकही बातमी आली नाही पाहिजे.

हे ही वाचा >> “मोदींनी RBI गव्हर्नर उर्जित पटेल यांची तुलना सापाशी केली”, अर्थखात्याच्या माजी सचिवांचा खळबळजनक दावा!

दरम्यान, चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी (२५ सप्टेंबर) प्रसारमाध्यमांशी बोलताना या व्हायरल ऑडिओ क्लिपबाबत स्पष्टीकरण दिलं. बावनकुळे म्हणाले, मी ते असंच बोललो. मी त्यांना बोललो की बाबा रे, आपण एवढं चांगलं काम करतो. पंतप्रधान मोदी यांनी नऊ वर्षात एवढं चांगलं काम केलं आहे. तरी आपल्याबद्दल नकारात्मक बातम्या येतात. त्यामुळे पत्रकारांबरोबर बसा, त्यांचा सन्मान करा. त्यांना चहा प्यायला घेऊन जा, तुम्ही त्यांना चहासाठी बोलवा किंवा तुम्ही त्यांच्याकडे जा. त्यांना खरी वस्तूस्थिती सांगा. शेवटी पत्रकार हे आपल्या व्यवस्थेचा चौथा संभ आहेत. त्यांना सन्मान देऊन त्यांच्याबरोबर चांगलं वागा. या पद्धतीचा सल्ला मी पदाधिकाऱ्यांना दिला. याच्यात काही वाईट नव्हतं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandrashekhar bawankule advice to party workers ask journalists for tea or dinner so wont print news against bjp asc
Show comments