शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी (२३ एप्रिल) जळगावमधल्या पाचोऱ्यातील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं. मोदींचा एकेरी उल्लेख करत ठाकरे म्हणाले की, तुला आगे ना पिछे, तुला कोणी नाहीये. कधी झोळी लटकवशील आणि निघून जाशील. पण माझ्या जनतेच्या हातात भिकेचा कटोरा देऊन जाशील त्याचं काय? उद्धव ठाकरेंच्या या टीकेनंतर भारतीय जनता पार्टी संतापली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे याबाबत म्हणाले, कुठे सूर्य आणि कुठे तुम्ही, बोलताना जरा तारतम्य बाळगा.
बावनकुळे म्हणाले की, मागेही मी सांगितलं होतं, स्वार्जनिक ठिकाणी बोलताना व्यक्तिगत टीका करू नका. त्यांनी आमच्या नेतृत्वाचा अपमान करू नये. स्फोट होतो एखाद्या दिवशी. तुम्ही आमच्या नेतृत्वाचा एकेरी उल्लेख करताय, याने एक दिवस स्फोट होऊ शकतो. मी मागेही सांगितलं होतं पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बोलताना तारतम्य बाळगा. असंतोष कधी भडकेल हे मला माहिती नाही.
हे ही वाचा >> “झोळी लटकवशील आणि…”, उद्धव ठाकरेंच्या नरेंद्र मोदींवरील टीकेला चंद्रशेखर बावनकुळेंचं प्रत्युत्तर, म्हणाले…
भाजपा प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, मी आधी सांगूनही काल पुन्हा उद्धव ठाकरे यांनी तीच चूक केली. पुन्हा पुन्हा जाणीवपूर्वक ते तसं करत आहेत, एकेरी बोलत आहेत. त्याचा कधी ना कधी निर्णय होईल. असंतोष भडकेलच. किती दिवस आम्ही संयम बाळगायचा? आमचे कार्यकर्ते किती दिवस हा एकेरी उल्लेख सहन करणार. लोकांना हे (उद्धव ठाकरे) संस्कार शिकवतात पण ते स्वतः कसे वागतात.