भारतीय जनता पार्टीच्या नेत्या पंकजा मुंडे पक्षावर नाराज असल्याची चर्चा सतत होत असते. पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर छापेमारी झाल्यानंतर पंकजा मुंडे यांनी त्यांची नाराजी उघडपणे बोलून दाखवली होती. विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर त्यांना भाजपा विधान परिषदेवर संधी देईल, असं बोललं जात होतं. परंतु, पंकजा मुंडे यांना पक्षाने ती संधी दिली नाही. दरम्यान, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांच्या नाराजीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी राष्‍ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर यांनी पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती. जानकर म्हणाले, माझ्या पक्षाचे १४५ आमदार निवडून आले तर आम्ही पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री करू.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महादेव जानकर यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. पंकजा मुंडेंवर अन्याय झाला आहे, हे खरं आहे, अशा आशयाचं वक्तव्य त्यांनी केलं आहे. गायकवाड म्हणाले, “हो, हे खरं आहे की, पंकजा मुंडेंवर अन्याय झाला आहे. त्यांच्या वडिलांनी महाराष्ट्रातील जनतेसाठी आणि समाजासाठी खूप काही केलं आहे, परंतु, असं कुठेतरी वाटतंय की मागच्या काही निवडणुकांमध्ये त्यांच्यावर अन्याय झाला आहे.” संजय गायकवाड यांच्या वक्तव्यानंतर काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनीदेखील असंच वक्तव्य केलं आहे. पंकजा मुंडे यांना न्याय मिळायला हवा, असं वक्तव्य ठाकूर यांनी केलं आहे.

पंकजा मुंडे यांच्या नाराजीच्या चर्चांवर भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बावनकुळे म्हणाले, माझं दर आठ-दहा दिवसांनी पंकजा मुंडे यांच्याशी बोलणं होतं, भेटणं होतं. अलिकडेच मी त्यांना भेटून आलो. त्या नाराज नाहीत. पंकजा मुंडे यांना बदनाम करण्याचा प्रयत्न होतोय. त्यांच्या नेतृत्वाला बदनाम करण्याचं काम केलं जात असतं. वेगवेगळ्या माध्यमातून असे प्रकार होत असतात.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, काहींना वाटतं की, पंकजा मुंडे पक्षावर नाराज राहिल्या तर त्याचा त्यांना काहीतरी फायदा होईल. परंतु, पंकजा मुंडे यांच्या रक्तात भाजपा आहे. त्यांचे वडील गोपीनाथ मुंडे यांच्या कर्तृत्वाने महाराष्ट्रात भाजपा उभी राहिली आहे. पंकजा मुंडे पक्षावर नाराज राहू शकणार नाहीत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandrashekhar bawankule answer on congress allegation bjp done injustice to pankaja munde asc