शिवसेनेच्या शिंदे गटाने ‘राष्ट्रामध्ये मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे’ अशा मथळ्याखाली एक जाहिरात प्रसिद्ध केली आहे. अनेक वर्तमान पत्रांच्या पहिल्या पानावर ही जाहिरात दिसतेय. या जाहिरातीत एका सर्वेक्षणाचा दाखला देण्यात आला आहे. या सर्वेक्षणानुसार राज्यातल्या जनतेने मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा एकनाथ शिंदे यांना अधिक पसती दर्शवली आहे. तसेच भारतीय जनता पार्टी आगामी निवडणुका शिंदे गटाच्या पाठिंब्याशिवाय जिंकू शकत नाही असा संदेशही देण्याचा प्रयत्न केला आहे. या जाहिरातीवर वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. यावर आता भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाष्य केलं आहे.
प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी बावनकुळे यांना विचारलं की, या जाहिरातीच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न केला जातोय, असं तुम्हाला वाटतं का? यावर चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, २०१४ मध्ये आम्हाला १२४ च्या वर जागा मिळाल्या. २०१९ मध्ये भाजपा सेना युतीला स्पष्ट बहुमत मिळालं. आता आपलं सरकार आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत, तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आहेत. दोघंही चांगलं काम करत आहेत. फडणवीसांनी यंदा सादर केलेला अर्थसंकल्प लोकप्रिय होता. त्यामुळे या सरकारची कामगिरी आपल्याला त्या सर्वेक्षणातून दिसून येत आहे. त्यामुळे देवेंद्रजी मागे पडले एकनाथजी पुढे गेले हा जो निष्कर्ष आपण लावत आहात, त्या निश्कर्षाला काही अर्थ नाही.
बावनकुळे म्हणाले, शिवसेना आणि भाजपा भाऊ म्हणून काम करत आहे. एकनाथ शिंदेंच्या मनात कधी येत नाही की, त्यांना देवेंद्रजींपेक्षा जास्त पसंती आहे. तसेच देवेंद्रजींना असं वाटत नाही की, एकनाथजींपेक्षा त्यांना जास्त पसंती आहे. शेवटी दोघेही चांगले बॅट्समन आहेत. जोरात काम करत आहेत. जनतेला काय पाहिजे ते महत्त्वाचं आहे. कोण पुढे आणि कोण मागे हे महत्त्वाचं नाही.
हे ही वाचा >> “एकनाथ शिंदेंची मोठी झेप, देवेंद्र फडणवीसांना…”, शिंदे गटाच्या जाहिरातीचं छगन भुजबळांना आश्चर्य; म्हणाले…
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, या राज्याला नवीन सरकारडून अपेक्षा आहेत, देवेंद्रजींकडून अपेक्षा आहेत, एकनाथ शिंदेंकडून अपेक्षा आहेत. त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी जनतेने या हे सरकार निवडलं आहे. त्यामुळे या जाहिरातीचा विचार न करता सरकारचं काम जनतेत पोहोचवून २०२४ मध्ये पुन्हा एकदा भाजपा शिवसेना युतीचं सरकार महाराष्ट्रात आणायचं हे आमचं ध्येय आहे. मोदीजींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी, देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी, तसेच जगातलं सर्वोत्तम राष्ट्र निर्माण करण्याकरता आगामी लोकसभा निवडणुकीत ४५ पेक्षा जास्त जागा भाजपा-शिंदे सरकारला कशा देता येतील यावर आमचा विचार सुरू आहे.