भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांच्यावर भाजपाने मोठी जबाबदारी सोपवली आहे. त्यांची भाजपा महिला आघाडीच्या अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली आहे. याबाबतची अधिकृत घोषणा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. चित्रा वाघ यांच्याकडे ही जबाबादारी आल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. तसेच महिलांचे प्रश्न प्रभाविपणे मांडून ते सोडविण्याचे त्या निश्चित प्रयत्न करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
राज्यातील महिलांच्या प्रश्नावर चित्रा वाघ या आक्रमक भूमिका घेताना दिसतात. टिकटॉकर पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात त्यांनी शिवसेना पक्षातील नेते संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. तेव्हा पत्रकार परिषदा तसेच इतर माध्यमातून चित्रा वाघ संजय राठोड यांच्याविरोधात टीका करताना दिसत होत्या. तसेच राज्यातील इतर महिला अत्याचाराच्या प्रश्नावरही त्यांनी सरकारला जाब विचारण्याचा प्रयत्न यापूर्वी केला आहे. राष्ट्रवादी पक्षातून भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्यावर अद्याप कोणतीही मोठी जबाबदारी सोपवण्यात आली नव्हती. मात्र आता त्यांची भाजपा महिला आघाडीच्या अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे या नेमणुकीनंतर त्यांच्यावर मोठी जबाबदारी आल्याचे म्हटले जात आहे.
हेही वाचा >>> “शिवसेना आमचा नैसर्गिक मित्र नाही,” महाविकास आघाडीवर बोलताना नाना पटोलेंचे मोठे विधान, म्हणाले “आम्हाला संभ्रम…”
दरम्यान, ही नवी जबाबदारी आल्यानंतर चित्रा वाघ यांनी चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहे. तसेच ‘भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देऊन पक्षाने माझ्यावर जो विश्वास दाखवला, तो मी नक्कीच सार्थ ठरवेन,’ असे आश्वासनही त्यांनी पक्षश्रेष्ठींना दिले आहे.