Chandrashekhar Bawankule On Ramdas Athawale : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार नागपूरमध्ये १५ डिसेंबर रोजी पार झाला. या मंत्रिमंडळात भाजपा, शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या काही आमदारांनी मंत्रि‍पदाची शपथ घेतली. मात्र, महायुतीमधील काही नेत्यांना या मंत्रिमंडळातून डावलण्यात आलं. त्यामुळे महायुतीमधील काही नेत्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. असं असताना या महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियालाही एकही मंत्रिपद देण्यात आलं नाही. तसेच मंत्र्यांच्या शपथविधीच्या कार्यक्रमाचं निमंत्रणही महायुतीकडून देण्यात न आल्यामुळे रामदास आठवले यांनी नाराजी व्यक्त केली होती. मात्र, त्यानंतर आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी रामदास आठवले यांची माफी मागितली आहे. “मी रामदास आठवले यांची माफी मागतो”, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले?

“महायुती सरकारच्या मंत्रिपदाच्या शपथविधीचा कार्यक्रम हा १४ डिसेंबर रोजी होणार होता. पण आमचे आमदार आधीच नागपूरला गेले होते. त्यामुळे शपथविधीचं स्थळ अचानक बदललं गेलं. या शपथविधीच्या कार्यक्रमासाठी मी सर्व पक्षांना पत्राच्या माध्यमातून निमंत्रण पाठवलं होतं. मात्र, मी स्वत: जाऊन रामदास आठवले यांना निमंत्रण द्यायला पाहिजे होतं, ते देऊ शकलो नाही. त्याबद्दल मी त्यांची माफी मागतो. रामदास आठवले यांची मी माफी देखील मागितली आहे. रामदास आठवले यांचं आमच्या महायुतीतं मोठं स्थान आहे. त्यांची जी कोणती मागणी असेल त्याबाबत आमचं केंद्रातील नेतृत्व आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे योग्य निर्णय घेतील. आम्ही त्यांचा आदर करतो”, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा : मंत्रिपद न मिळाल्याने नाराज आहात का? दिलीप वळसे पाटलांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया; भुजबळांबाबतही केलं मोठं भाष्य

रामदास आठवले काय म्हणाले होते?

“महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज नागपूरमध्ये पार पडला. या सोहळ्याला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित होते. मात्र, महायुतीचा एक भाग असूनही शपथविधीचं मला निमंत्रण देखील आलं नाही. मग जेव्हा निवडणुका असतात, तेव्हा मला सगळीकडे नेलं जातं. आता शपथविधीसाठी मला निमंत्रणही मिळालं नाही. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने विधानसभा निवडणुकीत चांगली कामगिरी केली. आमचा समाज मोठ्या संख्यने भाजपाबरोबर राहिला. तरीही लोकसभेच्या निवडणुकीत एकही जागा रिपब्लिकन पार्टीला दिली नव्हती. विधानसभेच्या निवडणुकीतही एकही जागा आम्हाला दिली नाही”, असं रामदास आठवले यांनी म्हटलं होतं.

“मी आणि माझे कार्यकर्तेही नाराज…”

“आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठका घेतल्या होत्या, त्यांनी आम्हाला किमान एक विधानपरिषदेची जागा देण्याचं आश्वासन दिलं होतं. तसेच एक मंत्रिपद देण्याचं आश्वासन दिलं होतं. पण या मंत्रिमंडळात रिपब्लिकन पार्टीचा एकही चेहऱ्याला संधी मिळाली नाही. तसेच गेल्या अडीच वर्षांच्या सरकामध्येही आमच्या पक्षाचा एकही मंत्री नव्हता. केंद्रात मला एक मंत्रिपद मिळालं. पण ज्या कार्यकर्त्यांनी मला मंत्रि‍पदापर्यंत पोहोचवलं त्या कार्यकर्त्यांनाही सत्तेत भागेदारी मिळाली पाहिजे. याबाबत मी देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली होती. तेव्हा त्यांनी म्हटलं होतं की यावेळी संधी दिली जाईल. पण संधी न मिळाल्यामुळे मी नाराज आहे आणि माझे कार्यकर्तेही नाराज आहे. भाजपाने रिपब्लिकन पार्टीकडे दुर्लक्ष करणं हे योग्य नाही. याबाबत आमची नाराजी आहे”, असं रामदास आठवले यांनी म्हटलं होतं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandrashekhar bawankule asked ramdas athawales apology inmaharashtra cabinet expansion mahayuti politics gkt