सनातन धर्माचं मलेरिया, डेंग्यू, करोना किंवा अन्य रोगांप्रमाणे उच्चाटन झालं पाहिजे, असं विधान तामिळनाडूचे क्रीडामंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी केलं होतं. या वक्तव्यावरून देशभरात बराच गदारोळ झाला. यावरून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना थेट आव्हान दिलं आहे.
“उदयनिधी स्टॅलिन यांचं वक्तव्य शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना मान्य नसेल, तर ‘इंडिया’ आघाडीची साथ सोडली पाहिजे,” असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
हेही वाचा : “नीलम गोऱ्हे अपात्र व्हायला पाहिजेत, कारण…”, अनिल परब यांचं विधान
बावनकुळे म्हणाले, “‘इंडिया’ आघाडीत असलेले तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांनी ‘हिंदू धर्म संपत नाही, तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही’ असं विधान केलं. या वक्तव्याला उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी स्विकारलं आहे.”
हेही वाचा : “भाजपाविरोधात एकही बातमी आली नाही पाहिजे”; बावनकुळेंच्या वक्तव्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले…
“पण, ‘इंडिया’ आघाडीत असलेल्या शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना उदयनिधी स्टॅलिन यांचं वक्तव्य मान्य असेल, तर त्यांनी सांगितलं पाहिजे. मान्य नसेल, तर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी ‘इंडिया’ आघाडीची साथ सोडली पाहिजे. सत्तेच्या लालसेपोटी हिंदूस्तानातील हिंदू संस्कृती संपवण्याची भाषा करणाऱ्यांबरोबर शरद पवार आणि उद्धव ठाकरे आहेत,” अशी टीका बावनकुळे यांनी केली आहे.