भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपा नेत्या पंकजा मुंडे आणि पक्षाच्या बदनामीबाबत मोठं विधान केलं. “भाजपामध्येच पंकजा मुंडे आणि पक्षाला बदनाम करणारा एक गट आहे,” असं मत चंद्रशेखर बावनकुळेंनी व्यक्त केलं. ते बीडमधील एक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शनिवारी (२१ जानेवारी) माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देत होते.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “भाजपामध्येच पंकजा मुंडे आणि पक्षाला बदनाम करणारा एक गट आहे. तेच ही बदनामी करत आहेत. कालच्या माझ्या संपूर्ण प्रवासात पंकजा मुंडे माझ्यानंतरच बोलल्या. मी पंकजा मुंडेंना प्रथम स्थान दिलं. ती माझी जबाबदारी आहे, मी काही उपकार केलेले नाहीत.”
हेही वाचा : VIDEO: आगामी निवडणुकीत पंकजा मुंडे आणि तुमचं वेगळं समीकरण दिसणार का? महादेव जानकर म्हणाले, “माझी बहिण…”
“पंकजा मुंडे आमच्या नेत्या आहेत. त्या आमच्या राष्ट्रीय सचिव आहेत. त्यामुळे त्यांना नंतर बोला, मी आधी बोलतो हा त्यामागील आशय होता,” असंही चंद्रशेखर बावनकुळेंनी नमूद केलं.
पंकजा मुंडेंच्या नाराजीच्या चर्चेवर बावनकुळेंची प्रतिक्रिया
दरम्यान, पंकजा मुंडे खरंच नाराज आहेत? या प्रश्नावर चंद्रशेखर बावनकुळेंनी याआधीही प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले होते, “पंकजा मुंडे माझ्याशी रोज बोलतात. माझी आणि त्यांच्याशी परवाच चर्चा झाली. परवा त्यांची प्रकृती ठिक नव्हती. कधीकधी व्यक्तिगत अडचणी येत असतात. एखाद्या कार्यक्रमाला एखादा नेता उपस्थित राहू शकत नाही. प्रत्येक नेत्याची व्यस्तता वेगळी असते. आज देवेंद्र फडणवीस बीडमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून गेले आहेत. त्या कार्यक्रमाला एखादा आमदार नसेल तर त्याने दांड मारली असे म्हणायचे का?”
“एक नेता गेल्यानंतर दुसरा नेता हजर राहणे गरजेचे आहे का? एकाच कार्यक्रमाला चार-पाच नेत्यांना अडकवून कशाला ठेवायला हवे. त्यापेक्षा वेगवेगळे कार्यक्रम केलेले कधीही चांगले. कोणताही वेगळा अर्थ काढू नये. पंकजा मुंडे या नेत्या आहेत. त्यांचेही वेगळे कार्यक्रम आहेत,” असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले होते.
हेही वाचा : शेवटी शोध लागला! नितीन गडकरींना धमकी देणारा निघाला कुख्यात गुंड; तुरुंगातून केला फोन
“पंकजा मुंडे यांच्या रक्तात भारतीय जनता पार्टी आहे. त्या कधीच दुसऱ्या पक्षात जाऊ शकत नाहीत. या सर्व फक्त चर्चा आहेत. विरोधकांनी त्यांचा पक्ष सांभाळला पाहिजे. पंकजा मुंडे यांच्याबद्दल त्यांनी अफवा पसरवू नये. त्या प्रगल्भ नेत्या आहेत. त्या राष्ट्रीय राजकारणात आहेत. त्यांच्यावर गोपीनाथ मुंडे यांचे संस्कार आहेत. पंकजा मुंडे यांना कोणीही फूस लावू शकत नाही,” असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला होता.