शरद पवारांनी अडीच वर्षांपूर्वी उद्धव ठाकरे यांच्यावर जादूटोणा केला हे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेलं विधान कायद्याच्या विरोधात असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि शरद पवारांचे नातू रोहित पवार यांनी केला आहे. साताऱ्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना बावनकुळे यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं. शरद पवारांनी जादूटोणा केल्याने उद्धव ठाकरे फसले आणि विचार न करता राष्ट्रवादी काँग्रेससह गेले असं बावनकुळेंनी म्हटलं आहे. दरम्यान, बावनकुळेंच्या या टीकेवरुन रोहित पवार यांनी कठोर शब्दांमध्ये संताप व्यक्त केला आहे. रोहित पवार यांनी दाभोलकरांचा फोटो शेअर करत आपल्या भावनांनी वाट मोकळी करुन दिली आहे.
नेमकं प्रकरण काय?
साताऱ्यामध्ये पत्रकारांशी संवाद साधताना उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादीबरोबर जात सरकार स्थापन केल्याच्या मुद्द्यावरुन बावनकुळेंनी टीका केली. त्याचवेळी त्यांनी जादुटोण्याचा उल्लेख केला. “जयंत पाटीलांनी सत्तेचं स्वप्न पाहणं सोडून दिलं पाहिजे. आजही ते स्वप्नात असतील, त्यांना सत्ता गेल्यासारखं वाटत नाही. बेईमानी करत त्यांनी यशस्वीपणे सरकार स्थापन केलं होतं. एकाप्रकारे उद्धव ठाकरेंवर जादूटोणा केल्यासारखा हा प्रकार झाला. त्या जादूटोण्यात उद्धव ठाकरे फसले. खासकरुन राष्ट्रवादीनेच उद्धव ठाकरेंवर जादूटोणा केला. त्यामुळे उद्धव ठाकरेंचं मन वळलं आणि दरवाजे बंद करुन शरद पवारांकडे गेले. पण आता आम्ही फार जागरुक आहोत, शिंदे-फडणवीस सरकार २०० हून अधिक जागा आणणार आहे,” असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. जादूटोणा करणारे भोंदूबाबा कोण? असे विचारले असता, “ते भोंदूबाबा कोण, हे पूर्ण देशाला आणि राज्याला माहिती आहे. शरद पवारांच्या ताब्यात एकदा कोणी आला, तर त्याची सुटका होत नाही”, असं ते म्हणाले.
रोहित पवार काय म्हणाले?
बावनकुळेंच्या या विधानावरुन राजकीय क्षेत्रातून प्रतिक्रिया उमटत असतानाच रोहित पवार यांनी ट्वीटरवरुन बावनकुळेंच्या पत्रकार परिषदेतील फोटो आणि अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक नरेंद्र दाभोलकरांचा फोटो पोस्ट करत प्रतिक्रिया नोंदवली आहे. “अंधश्रद्धा व जादूटोणाविरोधी कायदा ज्यांच्यामुळे संमत झाला त्या डॉ.नरेंद्र दाभोलकरांच्या साताऱ्यात भाजपा प्रदेशाध्यक्षांची जादूटोण्याची भाषा पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी आणि महाराष्ट्राचा व या कायद्याचा अवमान करणारी आहे. शिवाय जादूटोणाविरोधी कायद्यालाच हे आव्हान आहे,” असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
विचारांच्या बाबतीतही महाराष्ट्राला मागं आणण्याचा डाव
तसेच अन्य एका ट्वीटमध्ये, “आता याबाबत राज्य सरकार काय करतं याकडं सर्वांचं लक्ष लागलंय! राज्यातले प्रकल्प गुजरातला नेऊन प्रगतीच्या बाबतीत महाराष्ट्राला मागं आणण्याचा प्रयत्न तर भाजपकडून सातत्याने होतच आहे, पण विचारांच्या बाबतीतही महाराष्ट्राला मागं आणण्याचा त्यांचा डाव स्पष्ट दिसतोय,” असा आरोप रोहित पवार यांनी केला आहे.
रोहित पवारांबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनीही या विधान निषेध करत बावनकुळेंना प्रत्युत्तर दिलं आहे. भाजपा नेत्यांची मानसिकता बिघडली असून त्यातून अशी बेताल वक्तव्य होत असल्याचे ते म्हणाले. “चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवारांबाबत जे बेताल वक्तव्य केलं आहे, त्याचा मी निषेध करतो. शरद पवार हे महाराष्ट्राचे भूषण आहेत. ते महाराष्ट्राला लाभलेलं वरदान आहे. आज राज्यात जो विकास झाला आहे, त्यात सिंहाचा वाटा हा शरद पवारांचा आहे. ज्यावेळी महाराष्ट्रावर पूर किंवा भूकंप यासारखी संकटं आली, त्यावेळी शरद पवार धावून गेले. महाराष्ट्राला संकटातून बाहेर काढण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. त्यांच्याबाबत अशी बेताल वक्तव्य करणं बावनकुळेंना शोभतं नाही”, असे प्रत्युत्तर लंके यांनी दिलं.