भाजपा नेते विनोद तावडे यांच्या नेतृत्वात एक सर्व्हेक्षण झालं आहे आणि त्यांनी दिलेल्या अहवालानुसार आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाची ताकद घटेल, असा दावा करण्यात येत आहे. याबाबत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना विचारलं असता त्यांनी या अहवालातील दाव्यांवर भूमिका स्पष्ट केली. ते बुधवारी (१९ एप्रिल) नागपूरमध्ये पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देत होते.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “भाजपात अशी कोणतीही तावडे समिती तयार झालीच नाही. समितीच नव्हती, त्यामुळे असा कोणताही अहवालच तयार झाला नाही. कुणीतरी आपल्याच मनाने कपोलकल्पित बातम्या तयार केल्या आणि जाणीवपूर्वक या बातम्या चालवल्या. भाजपा मागे पडला आहे असं चित्र निर्माण करण्यासाठी ही बातमी होती.”
“…तर मुख्यमंत्री त्या तक्रारीची चौकशी करतील”
महाराष्ट्र ड्रग्ज असोसिएशनने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून मंत्री संजय राठोड यांच्या विभागात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप केलाय. याबाबत विचारलं असता चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “ड्रग्ज असोसिएशनने पत्र दिलं असेल तर मुख्यमंत्री त्या तक्रारीची चौकशी करतील.”
हेही वाचा : ‘कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ’, अजित पवारांचा उल्लेख करत भाजपाकडून संजय राऊत लक्ष्य, म्हणाले, “उद्धव ठाकरे…”
“फडणवीस व सर्व मंत्री खारघर घटनेकडे लक्ष ठेऊन”
खारघर येथील घटनेनंतर भाजपा नेते बाधित नागरिकांना भेटायला गेले नाहीत. या घटनेची संपूर्ण जबाबदारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गटाची आहे, असं भाजपाचं धोरणं असल्याचा आरोप होतोय. त्यावर बावनकुळे म्हणाले, “देवेंद्र फडणवीस व सरकारमधील सर्व लोक, मंत्री या घटनेकडे लक्ष ठेऊन आहेत. गिरीश महाजन यांच्या माध्यमातून रुग्णालयात संपूर्ण व्यवस्था केली जात आहे. तानाजी सावंतही यात मोठ्या प्रमाणात लक्ष देत आहेत. देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे हेही लक्ष ठेऊन आहेत.”