राज्यात एकनाथ शिंदे गट आणि भाजपा यांचे संयुक्त सरकार आल्यानंतर राजकारण बदलले आहे. महाविकास आघाडी आणि शिंदे गट-भाजपा असा सरळ सामना पाहायला मिळतोय. राष्ट्रवादी, काँग्रेस, तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे समर्थक मोठ्या संख्याने भाजपा आणि शिंदे गटात सामील होत आहेत, असा दावा सत्ताधाऱ्यांकडून केला जातोय. तर दुसरीकडे विरोधकांकडून या दाव्याचे खंडन केले जात आहे. असे असताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठे विधान केले आहे. जशी २०२४ ची निवडणूक जवळ येईल, तसे विरोधकांना मोठे बॉम्बस्फोट आणि धक्के बसतील, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.
मी महाराष्ट्रभर फिरतोय. राष्ट्रवादी, काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे शिल्लक असलेले तालुका, जिल्हा पातळीवरील कार्यकर्ते भाजपात प्रवेश करत आहेत. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे मंत्रालयात आलेच नव्हते. त्यामुळे या काळात काहीही काम झाले नाही. एकट्या राष्ट्रवादीने सरकारला लुटले. महाविकास आघाडीच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे, असा दावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.
महाविकास आघाडीचे सरकार असताना राष्ट्रवादी पक्षातील प्रमुख ५० नेत्यांनाच फायदा झाला. राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांमध्ये निराशा आहे. महाविकास आघाडीमध्ये प्रचंड नाराजी आहे. पक्ष वाढवण्याच्या दृष्टीने भाजपा काम कारत आहे. आगामी काळात जशी २०२४ ची निवडणूक जवळ येईल, तसे तुम्हाला (विरोधकांना) अनेक धक्के बसतील. अनेक बॉम्बस्फोट पाहायला मिळतील, असे चंद्रशेखर बानवनकुळे भाजपामधील इनकमिंगबद्दल बोलताना म्हणाले.