मागील अनेक दिवसांपासून भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे नाराज असल्याचे म्हटले जात आहे. ठाकरे गटाकडून त्यांना ऑफरही देण्यात आली आहे. एकीकडे पंकजा मुंडे यांच्या नाराजीच्या चर्चा असताना दुसरीकडे आज (१५ जानेवारी) बीड जिल्ह्यातील गहिनीनाथ गडावरील एका कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच पंकजा मुंडे एका मंचावर येणार, असे म्हटले जात होते. मात्र पंकजा मुंडे यावेळी गहिनीनाथ गडावर उपस्थित राहणार नाहीत. यावरच आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पंकजा मुंडे यांच्या रक्तात भाजपा आहे. त्या कधीही दुसऱ्या पक्षात जाऊ शकत नाहीत. अफवा पसरवू नये, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत. ते मुंबईत माध्यम प्रतनिधींशी बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >> संजय राऊत खासदार कोणामुळे झाले? नारायण राणेंचा मोठा दावा; म्हणाले, “हे पाप तर…”

“पंकजा मुंडे माझ्याशी रोज बोलतात. माझी आणि त्यांच्याशी परवाच चर्चा झाली. परवा त्यांची प्रकृती ठिक नव्हती. कधीकधी व्यक्तिगत अडचणी येत असतात. एखाद्या कार्यक्रमाला एखादा नेता उपस्थित राहू शकत नाही. प्रत्येक नेत्याची व्यस्तता वेगळी असते. आज देवेंद्र फडणवीस बीडमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून गेले आहेत. त्या कार्यक्रमाला एखादा आमदार नसेल तर त्याने दांड मारली असे म्हणायचे का?” असा सवाल चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.

हेही वाचा >> सत्यजित तांबे की शुभांगी पाटील, नाशिक पदवीधरसाठी भाजपाचा कोणाला पाठिंबा? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “पाठिंब्यासाठी…”

“एक नेता गेल्यानंतर दुसरा नेता हजर राहणे गरजेचे आहे का? एकाच कार्यक्रमाला चार-पाच नेत्यांना अडकवून कशाला ठेवायला हवे. त्यापेक्षा वेगवेगळे कार्यक्रम केलेले कधीही चांगले. कोणताही वेगळा अर्थ काढू नये. पंकजा मुंडे या नेत्या आहेत. त्यांचेही वेगळे कार्यक्रम आहेत,” असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

हेही वाचा >>शेवटी शोध लागला! नितीन गडकरींना धमकी देणारा निघाला कुख्यात गुंड; तुरुंगातून केला फोन

“पंकजा मुंडे यांच्या रक्तात भारतीय जनता पार्टी आहे. त्या कधीच दुसऱ्या पक्षात जाऊ शकत नाहीत. या सर्व फक्त चर्चा आहेत. विरोधकांनी त्यांचा पक्ष सांभाळला पाहिजे. पंकजा मुंडे यांच्याबद्दल त्यांनी अफवा पसरवू नये. त्या प्रगल्भ नेत्या आहेत. त्या राष्ट्रीय राजकारणात आहेत. त्यांच्यावर गोपीनाथ मुंडे यांचे संस्कार आहेत. पंकजा मुंडे यांना कोणीही फूस लावू शकत नाही,” असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandrashekhar bawankule comments on pankaja munde upset over bjp prd